बातम्या
रोग्यमंत्र्यांचा सीपीआरवर अचानक धडक तपास – ‘लोकांनी काय मरायचं का?’
By nisha patil - 11/29/2025 3:18:06 PM
Share This News:
रोग्यमंत्र्यांचा सीपीआरवर अचानक धडक तपास – ‘लोकांनी काय मरायचं का?’
कोल्हापूरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजे हजारो गरिबांसाठी आशेचा एकमेव आधार. पण अलीकडेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रलंबित प्रस्तावांची ढिगारे, एजंटांचा हस्तक्षेप, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण आणि औषध खरेदीतील संशयास्पद अनियमितता अशा गंभीर मुद्द्यांमुळे हेच रुग्णालय टीकेच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच उपनेते संजय पवार यांनीही या सर्व अनियमिततेकडे बोट दाखवत गंभीर आरोप केल्यानंतर अखेर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वतःच मैदानात उतरले.
मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आबिटकरांचा ताफा अचानक सीपीआरच्या आवारात शिरला आणि क्षणातच रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय घेतलेल्या या विजिटदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी विविध विभागांची पाहणी करत अधिकारी-कर्मचाऱ्यांची जोरदार खबर घेण्यास सुरुवात केली. कामकाजातील उशीर, रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष, योजनांमध्ये घातली जाणारी अडथळे या सर्वांवर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“तुमच्यामुळे सीपीआरची बदनामी होते आहे. रुग्णांना मदत करण्यासाठी तुम्ही आहात, त्रास देण्यासाठी नाही. अशी सेवा देणार असाल तर लोकांनी काय मरायचं का? निवांत बसणे हा तुमचा जॉब नाही,” अशा तुफानी शब्दांत आबिटकरांनी प्रशासनाला फैलावर घेतले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभापासून नागरिकांना दूर ठेवणाऱ्यांवर त्यांनी विशेष संताप व्यक्त करत ‘ज्यांनी काम केले नाही, त्यांची गय केली जाणार नाही’ हे स्पष्ट केले.
रुग्णालयातील विभागप्रमुखांना थेट प्रश्न विचारत, दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना दिले. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या तक्रारींमुळे आधीच दबावाखाली असलेल्या सीपीआरच्या संपूर्ण यंत्रणेला या निरीक्षण दौऱ्याने जणू जाग आली.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे हे रुग्णालय अनेक वर्षांपासून सुविधा आणि सेवेत आदर्श मानले जात होते. मात्र गेल्या काही काळातील अनियमिततेमुळे त्याच्या प्रतिमेला तडा जाऊ लागला होता. आता आरोग्यमंत्र्यांच्या या कठोर पावलांनंतर तरी सीपीआरची सेवा व्यवस्था सुधारते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या पाहणीवेळी डॉ. अजित लोकरे, डॉ. भूषण मिरजे, डॉ. अनिता परितेककर, डॉ. अनिता सायबनवार, डॉ. गिरीश कांबळे, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, समाजसेवा अधिकारी शशिकांत रावळ, आरोग्यदूत बंटी सावंत आणि समन्वयक कृष्णा लोंढे उपस्थित होते.
रोग्यमंत्र्यांचा सीपीआरवर अचानक धडक तपास – ‘लोकांनी काय मरायचं का?’
|