बातम्या
सीपीआर रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांची अचानक धडक; अधिकाऱ्यांना फटकारत ‘कामात सुधारणा करा, नाहीतर कारवाई’चा इशारा
By nisha patil - 11/30/2025 1:17:02 PM
Share This News:
कोल्हापूर:- राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे अनेक प्रस्ताव महिनोन्महिने प्रलंबित असणे आणि शिक्षकांना देण्यात आलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामुळे सीपीआर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहे. या सर्व गंभीर अनियमिततेची तात्काळ दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल (दि. 28) दुपारी अनपेक्षितपणे सीपीआर रुग्णालयात धडक देत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
“तुमच्यामुळे सीपीआरची बदनामी होते आहे. लोकांसाठी असलेली योजनाच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. काम करायचं किती आणि पगार घ्यायचा किती? निवांत बसण्यासाठी तुम्हाला नोकरी दिलेली नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना फटकारले.
आरोग्यमंत्र्यांचा ताफा साडेतीनच्या सुमारास रुग्णालयात पोहोताच प्रशासनात मोठी खळबळ उडाली. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आधारवड ठरणारे सीपीआर रुग्णालय अलीकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे, औषध खरेदीतील अनियमितता, एजंटांचा वाढता हस्तक्षेप अशा गंभीर गैरव्यवहारांमुळे चर्चेत आहे. कालच उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केल्यानंतर या आकस्मिक पाहणीला अधिक महत्व प्राप्त झाले.
आबिटकर यांनी भेटीदरम्यान विविध विभागांचे प्रत्यक्ष निरीक्षण करत “रुग्णांकडे दुर्लक्ष का केले जाते?” असा थेट सवाल विभागप्रमुखांना केला. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना दिल्या. रुग्णालयातील दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना, मंत्र्यांच्या या कठोर दौर्यानंतर आता तरी सीपीआरचा कारभार सुधारेल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या पाहणीवेळी कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, डॉ. अनिता परितेककर, डॉ. अनिता सायबनवार, डॉ. गिरीश कांबळे, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, समाजसेवा अधिकारी शशिकांत रावळ, आरोग्यदूत बंटी सावंत, वैद्यकीय शिबीर समन्वयक कृष्णा लोंढे यांसह रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
सीपीआर रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांची अचानक धडक; अधिकाऱ्यांना फटकारत ‘कामात सुधारणा करा, नाहीतर कारवाई’चा इशारा
|