बातम्या
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी च्या वतीने देऊळवाडीत आरोग्य शिबिर संपन्न
By nisha patil - 9/24/2026 8:55:17 PM
Share This News:
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी च्या वतीने देऊळवाडीत आरोग्य शिबिर संपन्न
*86नागरिकांची आरोग्य तपासणी
**आजरा(हसन तकीलदार)*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीच्या वतीने व जय भवानी तरुण मंडळ, देऊळवाडी यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आणि ‘तीशीचा पल्ला, तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देऊळवाडीचे उपसरपंच संजयभाई सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात तब्बल 86 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. 46 नागरिकांची रक्त तपासणी तर 26 जणांचे ईसीजी करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव व डॉ. कुमार यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तपासणीदरम्यान आढळलेल्या किरकोळ आजारांवर आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तसेच आजारांचे वेळीच निदान, नियमित तपासणी व योग्य उपचाराचे महत्त्व याबाबत डॉ. गुरव यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असून उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान झाल्यास भविष्यातील आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यास मदत होते, असा आरोग्य संदेश यावेळी देण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी विशेष परिश्रम घेतले. जय भवानी तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी च्या वतीने देऊळवाडीत आरोग्य शिबिर संपन्न
|