बातम्या
जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’
By nisha patil - 9/16/2025 3:47:39 PM
Share This News:
जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’
कोल्हापूर, दि. 16 : महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ हे विशेष अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार, आवश्यक संदर्भ सेवा व समुपदेशन करण्यात येणार आहे. विशेषतः सर्व माता व मुली, महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेएन यांनी केले आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी 81 आरोग्यवर्धीनी केंद्रे, नगरपालिका, सर्व आरोग्य नागरी केंद्रे व 413 उपकेंद्र या ठिकाणी 20 प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, जागृत करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे हे आहे. शिबिरामध्ये विशेषतज्ञांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिबीरासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून या अभियानात जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्र सहभागी होणार आहेत. या अभियानामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रोत्साहन मिळेल आणि गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मदत होईल, यामुळे स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.
अभियानातील उपक्रम -
सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा, रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी, स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी, विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन
निरोगी जीवनशैली आणि पोषण-
स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार मासिक पाळी स्वच्छता व पोषण, टेक-होम राशन (THR) चे वितरण
आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी-
माता व बालसुरक्षा (एमसीपी) कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी, आयुष्मान वय वंदना कार्ड,सिकल सेल कार्ड, पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थी नोंदणी, नागरिकांचा सक्रिय सहभाग, रक्तदान शिबीर, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी, अवयवदान नोंदणी इ.
या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिलांना तपासणीसाठी सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’
|