विशेष बातम्या
फादर्स डे दिवशी घडलेली हृदयद्रावक दुर्घटना; उजळाईवाडीतील माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
By nisha patil - 6/16/2025 10:24:14 PM
Share This News:
फादर्स डे दिवशी घडलेली हृदयद्रावक दुर्घटना; उजळाईवाडीतील माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत उजळाईवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील मूळ रहिवासी व सध्या पुण्यात आयटी कंपनीत कार्यरत रोहित सुधीर माने (वय ३०) आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा विहान या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी शमिका माने (वय २८) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोहित माने हे सध्या पुण्यातील चिंचवड परिसरातील प्रेम लोक पार्क येथे पत्नी व मुलासह राहत होते. मूळ गावी, गणेश कॉलनी, उजळाईवाडी, येथे माने कुटुंब स्थायिक आहे. सुट्टीच्या दिवशी ते आपल्या कुटुंबासोबत निसर्गरम्य ठिकाणी गेले होते. मात्र पुलाच्या अचानक कोसळण्याने आनंदाचा क्षण दुःखात बदलला.
स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने मदत कार्य सुरू केलं. दुर्घटनाग्रस्त पुलाची स्थिती धोकादायक असल्याचं आधीपासून लक्षात येऊनही उपाययोजना न झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेने उजळाईवाडी तसेच पुण्यातील माने कुटुंबीय व त्यांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. फादर्स डे दिवशीच पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
फादर्स डे दिवशी घडलेली हृदयद्रावक दुर्घटना; उजळाईवाडीतील माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
|