बातम्या
सोलापुरात अतिवृष्टी! रात्रीपासून मुसळधार पावसाने शेती, रस्ते आणि घरे जलमय
By nisha patil - 12/9/2025 12:17:40 PM
Share This News:
सोलापुरात अतिवृष्टी! रात्रीपासून मुसळधार पावसाने शेती, रस्ते आणि घरे जलमय
सोलापूर, ता. ११ :
गुरुवारी रात्री दोन ते सकाळी सात या अवघ्या पाच तासांत सोलापूर जिल्ह्यातील तेरा महसूल मंडलांवर मुसळधार पावसाने धडक दिली. या पावसाने खरिपातील उडीद, मूग, तूर, सोयाबीनसह अनेक पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सात महसूल मंडलांत शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुका तसेच सोलापूर शहर परिसरात पूर्वा नक्षत्रातील पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले.
वाहतुकीचा संपर्क तुटला
तलाव परिक्षेत्रातील ओढ्यांना आलेल्या मोठ्या पुरामुळे ८५० क्युसेकचा विसर्ग सुरू झाला असून होटगी – सोलापूर शहराचा संपर्क तुटला आहे. साधारण १५ गावांचा रस्ते संपर्कही खंडित झाला आहे. शहरातील विडी घरकुल, शेळगी, अक्कलकोट रोड, अवंतीनगर, देगाव या भागांत पाणी घुसल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आला.
महामार्गांवर नदीचे स्वरूप
सोलापूर तुळजापूर, सोलापूर अक्कलकोट, सोलापूर – होटगी या तीन महामार्गांवर पाणी साचून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. पुलांवर पाणी आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून पाणी रस्त्यावर आले.
नांदेड, लातूर, धाराशिवही धुवाधार
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुका, तसेच लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही गुरुवारी मुसळधार पावसाची नोंद झाली. नांदेडमधील नऊ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
👉 शेतकरी कुटुंबांची हकनाक झालेली हानी पाहता सरकारकडून तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
सोलापुरात अतिवृष्टी! रात्रीपासून मुसळधार पावसाने शेती, रस्ते आणि घरे जलमय
|