बातम्या
राजाराम तलावातील कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम व वृक्षतोड थांबवण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
By nisha patil - 11/28/2025 3:21:16 PM
Share This News:
राजाराम तलावातील कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम व वृक्षतोड थांबवण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
राजाराम तलाव परिसरात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकामासह सुरु असलेली वृक्षतोड तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सोमवारी दिले. न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित बी. कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर याबाबतची सुनावणी झाली. स्थानिक वृक्षप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी वृक्षतोडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे.
कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्पासाठी आधीच अनेक झाडे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. तसेच उर्वरित ११५ झाडे तोडण्यासाठी महापालिकेने १६ सप्टेंबर रोजी नोटीस काढून हरकती मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी हरकती नोंदवल्या तरी महापालिकेकडून त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून आधी झालेल्या वृक्षतोडीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी माहिती अधिकार कायद्यानुसार मिळालेल्या नोंदी सादर केल्या. त्यानुसार उद्यान विभाग आणि सार्वजनिक माहिती अधिकारी यांनी वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले. निरीक्षण अहवालात अंदाजे ५०० झाडे माती भरावामुळे बाधित झाल्याचे नमूद आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन न्यायालयाने कन्व्हेन्शन सेंटरचे सुरू असलेले बांधकाम आणि परिसरातील अनधिकृत वृक्षतोड पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. राहुल वाळवेकर यांनी काम पाहिले, अशी माहिती मराठा रियासत फाउंडेशनचे प्रसाद मोहिते आणि सौरभ पोवार यांनी दिली.
राजाराम तलावातील कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम व वृक्षतोड थांबवण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
|