शैक्षणिक
हिंदीची ज्ञानभाषेकडे झालेली वाटचाल महत्त्वपूर्ण: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
By nisha patil - 12/1/2026 5:24:38 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: देशामध्ये सामाजिक, सांस्कृतिक एकोपा जोपासण्याबरोबरच हिंदी भाषेने ज्ञानभाषा म्हणून चालविलेली वाटचाल महत्त्वपूर्ण स्वरुपाची आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा हिंदी आणि क्रीडा अधिविभाग तसेच राजभाषा विभाग, यूको बँक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १०) विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. जाधव म्हणाल्या, भाषा मानवाची सांस्कृतिक ओळख निर्माण करते. मानवी प्रगतीतील महत्वपूर्ण टप्पा म्हणजे भाषेची निर्मिती. वर्तमानात जागतिक पातळीवर भारतीय भाषांनी आपले महत्व सिद्ध केले आहे. जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची असलेली हिंदी भाषा आपला गौरव आहे.
यानिमित्ताने आयोजित जी. डी. बिर्ला स्मृती व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते हिंद केसरी दिनानाथ सिंह यांनी राजर्षि शाहू महाराजांनी निर्माण केलेली कोल्हापूरची कुस्ती परंपरा आणि आपला हिंदकेसरी बनण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. नात्यातील गोडवा समाजाला पर्यायाने देशाला एकसंध ठेवतो. तो जपला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यूको बँकेचे राजभाषा अधिकारी अमरदीप कुलश्रेष्ठ यांनी राजभाषा, राष्ट्रभाषा व संपर्क भाषा यांतील फरक स्पष्ट करताना हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचे महत्व अधोरेखित केले.
हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश निकम यांनी परिचय करून दिला. अविनाश कांबळे व शीतल चौगले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अक्षय भोसले यांनी आभार मानले. यावेळी यूको बँकेच्या विद्यानगर शाखेचे प्रबंधक क्रांतीकुमार देवरे, क्रीडा अधिविभागाचे डॉ. एन. डी. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. जयसिंग कांबळे, अनमोल कोठाडिया, डॉ. संतोष कोळेकर, डॉ, सुवर्णा गावडे, प्रा. प्रतीक्षा ठुंबरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदीची ज्ञानभाषेकडे झालेली वाटचाल महत्त्वपूर्ण: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
|