ताज्या बातम्या

‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या नावावरून संत समजुतींचा अपमान – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे तक्रार

Hindu Janajagruti Samiti complains to the government


By Administrator - 9/10/2025 3:56:29 PM
Share This News:



‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या नावावरून संतपरंपरेचा अपमान – हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे तक्रार

कोल्हापूर | प्रतिनिधी राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, यामुळे समर्थ महाराजांचा आणि हिंदू धर्मश्रद्धांचा अपमान झाला आहे, असा आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या प्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवेदन देऊन या चित्रपटाचे नाव तात्काळ बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले की, "मनाचे श्लोक या ग्रंथाच्या नावाचा वापर केवळ व्यावसायिक लाभ, सवंग प्रसिद्धी आणि मनोरंजनासाठी केला जात आहे. हे संतपरंपरेचा अवमान असून, कोट्यवधी रामभक्तांच्या आणि समर्थभक्तांच्या भावना दुखावणारे आहे."

ते पुढे म्हणाले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुराण किंवा बायबलसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरून चित्रपट तयार केला गेला असता, तर त्याला सेन्सॉर बोर्ड परवानगी दिली असती का? मग हिंदू धर्मीयांच्या भावनांनाच वारंवार लक्ष्य का केले जाते?"

निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव तात्काळ व बिनशर्त बदलावे.

  • चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यास चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व सेन्सॉर बोर्ड जबाबदार राहतील.

  • सेन्सॉर बोर्डाने याबाबत तात्काळ कारवाई करावी.

  • भविष्यात धार्मिक प्रतीकांचा अशा प्रकारे गैरवापर होऊ नये यासाठी कठोर कायदा करण्यात यावा.

कायदेशीर आधार:
 घनवट यांनी लाल बाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृतपाल सिंग (2015) या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत स्पष्ट केले की, पवित्र धार्मिक ग्रंथांचे नावे व्यावसायिक फायद्यासाठी वापरता येत नाहीत. तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 299 अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे हा अजामीनपात्र गुन्हा असून, सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 नुसार अशा चित्रपटांना प्रमाणपत्र नाकारले जावे, असेही ते म्हणाले.

उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे  शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, शिवराष्ट्र सेनेचे अध्यक्ष  दिलीप भिवटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख  शशी बीडकर, महाराजा प्रतिष्ठानचे  निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे  अशोक गुरव, विश्‍व हिंदु परिषदेचे  प्रकाश कुलकर्णी, अखिल भारत हिंदू महासभेचे प्रशांत पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख गजानन तोडकर, हिंदू महासभेचे राज्य संघटक  मनोहर सोरप, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे आदी उपस्थित होते. निवेदन तहसीलदार  स्वप्नील पवार यांनी स्वीकारले.


‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या नावावरून संत समजुतींचा अपमान – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे तक्रार
Total Views: 59