बातम्या
लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : आमदार सतेज पाटील
By nisha patil - 6/5/2025 9:19:13 PM
Share This News:
लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : आमदार सतेज पाटील
कोल्हापूर, ता. ६ : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा लोकशाही मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी मैलाचा दगड ठरला आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. त्यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत, तो नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणारा असल्याचे नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक साडेचार वर्षांपासून प्रलंबित आहे, तसेच राज्यातील अनेक महापालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायतींमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ निवडणुका झालेल्या नाहीत. परिणामी प्रशासकांच्या ताब्यात कारभार असून, लोकशाही प्रक्रिया ठप्प झाली आहे.
“हा निर्णय म्हणजे नागरिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार पुन्हा मिळवून देण्याचे मोठे पाऊल आहे. निवडणूक प्रक्रिया ठप्प झाल्याने विकासकामांवर मर्यादा आल्या होत्या. आता नव्या नेतृत्वाला संधी मिळेल आणि स्थानिक गरजांनुसार निर्णय घेतले जातील,” असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
“संविधानिक रचनेचा गौरव राखणारा निर्णय” – आमदार सतेज पाटील
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीला बळकटी देणे आणि नागरिकांना त्यांच्या हक्कांचा वापर करण्याची संधी देणे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानिक रचनेचा गौरव अबाधित राखणारा आहे,” असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : आमदार सतेज पाटील
|