बातम्या
डासांची पैदास रोखा, हिवतापाला आळा घाला" — वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची जनजागृती मोहीम
By nisha patil - 6/25/2026 7:42:52 PM
Share This News:
*"डासांची पैदास रोखा, हिवतापाला आळा घाला" — वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची जनजागृती मोहीम*
*आजरा(हसनतकीलदार)*-:आरोग्य विभागामार्फत १ जून ते ३० जून हा कालावधी हिवताप जनजागरण महिना म्हणून साजरा करण्यात येत असून या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी यांच्या वतीने हिवताप प्रतिबंध व नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
"येता कणकण तापाची,करा तपासणी रक्ताची!" हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत आरोग्य विभागाने गावागावांत घरभेटी, कंटेनर सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थळांची तपासणी तसेच आरोग्य शिक्षणाचे उपक्रम राबविले. हिवतापाची लक्षणे, आजाराचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
मोहिमेदरम्यान साचलेले पाणी नष्ट करणे, पाण्याच्या टाक्या व भांडी झाकून ठेवणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळणे याबाबत जनजागृती करण्यात आली. ताप, थंडी वाजणे, घाम येणे, डोकेदुखी अथवा अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ रक्त तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
हिवताप हा संक्रमित मादी ॲनोफिलीस डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार असून वेळेवर निदान व उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येतात. त्यामुळे नागरिकांनी तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. ए. शेख आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान, आरोग्य सहायिका रंजना गावडे तसेच आरोग्य सेवक युनुस सय्यद, दर्शन भालेराव, दिपक हरणे, लक्ष्मण घोरपडे व रोहित शेंडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
डासांची पैदास रोखा, हिवतापाला आळा घाला" — वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची जनजागृती मोहीम
|