बातम्या

सुट्यांचा सीझन सुरू; कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी

Holiday season begins Huge rush of tourists at Kolhapurs tourist spots


By nisha patil - 12/29/2025 12:33:58 PM
Share This News:



कोल्हापूर :- नाताळ आणि वर्षाअखेरीच्या सुट्यांमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून, रंकाळा तलाव परिसर, न्यू पॅलेस, टाऊन हॉल संग्रहालय तसेच पन्हाळगड किल्ला येथे पर्यटकांची विशेष रौनक दिसून आली.

राज्यातील विविध भागांसह कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने पर्यटक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. परिणामी शहरातील खासगी हॉटेल्स, लॉज, धर्मशाळा आणि निवास व्यवस्था जवळपास हाऊसफुल झाली आहे. काही पर्यटकांना राहण्यासाठी आधीच बुकिंग करावे लागत असल्याचे चित्र आहे.

पर्यटकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः अंबाबाई मंदिर परिसर, रंकाळा चौपाटी आणि सीबीएस परिसरात वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेकडून नियोजन करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पर्यटन व्यवसायाला यामुळे मोठा फायदा होत असून, हॉटेल, रेस्टॉरंट, घोडागाडी, बोटिंग आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी नववर्ष स्वागतासाठीही पर्यटकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सुट्यांचा सीझन सुरू; कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी
Total Views: 29