बातम्या
सोशल मिडीयावरून हनीट्रॅप! मिरजेतील भामटी महिलेने तरुणांना लाखोंचा गंडा घातला
By nisha patil - 10/11/2025 5:02:19 PM
Share This News:
सोशल मिडीयावरून हनीट्रॅप! मिरजेतील भामटी महिलेने तरुणांना लाखोंचा गंडा घातला
मिरज | सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका भामट्या महिलेचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने हनीट्रॅपचा सापळा रचून कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातील अनेक तरुणांना फसवल्याची चर्चा असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरातील एका तरुणाने या महिलेकडून त्रस्त होऊन मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेच्या सोशल मिडीया प्रोफाईलवरून गुन्हा नोंदवला असून तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संशयित महिला मिरज शहरातील बखारभाग परिसरात राहते. तिने फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाउंट तयार करून तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. ओळख वाढल्यानंतर ती त्यांना भेटण्यासाठी बोलवत असे. मिरजेतील एका फ्लॅटमध्ये नेऊन संबंधीत तरुणांसोबत फोटो काढले जात. त्यानंतर हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची उकळपट्टी केली जात होती.
या हनीट्रॅपच्या जाळ्यात सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील चिक्कोडी व रायबाग परिसरातील अनेक तरुण अडकले असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र अद्याप महिलेची ओळख जाहीर केलेली नाही.
कोल्हापूरातील पीडित तरुणाने लाखो रुपये गमावल्यानंतर अखेर धैर्य एकवटून पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी संबंधित महिलेच्या सोशल मिडीया अकाउंटची तपासणी केली असून तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या सोशल मिडीया फसवणुकीत अडकलेल्या इतरांनीही पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा.
पोलिसांचे आवाहन: “सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या रिक्वेस्टवर सहज विश्वास ठेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा.”
सोशल मिडीयावरून हनीट्रॅप! मिरजेतील भामटी महिलेने तरुणांना लाखोंचा गंडा घातला
|