राजकीय
केंद्रासह राज्यात ही सत्ता नसल्यामुळे विरोधक निधी आणणार कसा...? मंत्री हसन मुश्रीफ यांना यांचा सवाल
By nisha patil - 8/1/2026 11:12:13 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. ७:- काँग्रेसची सत्ता केंद्रासह राज्यातही नाही. एकही आमदार नाही. त्यामुळे त्यांना केंद्राकडूनही निधी मिळणार नाही आणि राज्याकडूनही निधी मिळणार नाही. जिल्हा नियोजन मंडळातूनही त्यांना निधी मिळणार नाही. तर मग काँग्रेस पक्ष कोल्हापूर शहरातील नागरिकांना दाखवीत असलेली खोटी स्वप्ने आणि शहरातील विकासकामांचे प्रश्न कसे सोडवणार आहेत? असा सवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
ते पुढे म्हणाले, जनतेला फसवून, थापा मारून खोटी स्वप्ने दाखवू नका. याच्याही पुढे जाऊन माझी तर त्यांना जाहीर विनंती आहे की, सगळ्या उमेदवाऱ्या माघार घ्या. आम्ही काय- काय करणार आहोत ते आम्ही जनतेला स्टॅम्पवर लिहून देतो.
कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्र. ३, १२, १४, १९ मध्ये जाहीर सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता महायुतीला द्या; कोल्हापूर शहराचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही. विरोधी महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास महायुतीच करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सीपीआर आणि शेंडा पार्क.....!
श्री. मुश्रीफ म्हणाले, महायुतीचे सरकार हे जनतेची सेवा करणारे सरकार आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सी. पी. आर. चा शंभर कोटी निधीतून कायापालट होत आहे. येत्या दोन-तीन महिन्यात या थोरल्या दवाखान्याचे रूप मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल यासारखे सुंदर होईल. शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे. तिथे अकराशे बेडचे हॉस्पिटल निर्माण होत आहे. यामध्ये ६०० बेड्सचे सामान्य रुग्णालय, अडीचशे बेड्सचे अतिविशेषोपचार रुग्णालय आणि अडीचशे बेड्सचे कॅन्सर हॉस्पिटल साकारत आहे. कोल्हापूरच्या एकाही रुग्णाला मुंबई किंवा पुण्याला उपचारासाठी जावे लागणार नाही.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे....!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर शहराध्यक्ष व महायुतीचे उमेदवार आदिल फरास म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फरासखाण्याची जबाबदारी असलेले आमचे पूर्वज महाराजांचे निष्ठावंत पाईक होते. महाराजांनी सगळ्यात मोठ्या विश्वासाचे काम आमच्यावर सोपविलेले होते. आम्ही देखील तितक्याच निष्ठा आणि प्रामाणिकपणाने छत्रपतींची जीवापाड सेवा करणारे लोक आहोत. महाराजांचा तोच विचार, विश्वास, निष्ठा जपत आम्ही कोल्हापूरच्या या भूमीवर वाढलो आणि जगलो आहोत. आजपर्यंत आम्ही निष्ठावंतपणे केलेली महाराजांची सेवा आणि तुमचं- आमचं नातं दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रासह राज्यात ही सत्ता नसल्यामुळे विरोधक निधी आणणार कसा...? मंत्री हसन मुश्रीफ यांना यांचा सवाल
|