बातम्या
मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार? – आमदार राजेश क्षीरसागर यांचा पलटवार
By nisha patil - 4/10/2025 2:51:15 PM
Share This News:
मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार? – आमदार राजेश क्षीरसागर यांचा पलटवार
हिम्मत असेल तर थेट पाईपलाईनच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करावी – क्षीरसागर यांची टीका
कोल्हापूर, दि. ३ : महानगरपालिकेत सत्ता उपभोगूनही जनतेच्या हितासाठी अपयशी ठरलेले आमदार सतेज पाटील आता जनहिताचे धडे देत फिरत आहेत. “मला विधिमंडळाचे कायदे शिकवू नका,” असा थेट पलटवार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जर खरी हिम्मत दाखवायची असेल, तर त्यांनी गळक्या थेट पाईपलाईन योजनेच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करावी. ठेकेदारांचा पुळका नको, शहरवासीयांच्या पाण्याच्या त्रासाकडे लक्ष द्या.
“१०० कोटींचे रस्ते करण्याची धमक आमच्यात आहे”
क्षीरसागर म्हणाले, “रस्त्यांच्या कामात झालेल्या दिरंगाई व दर्जाबाबत अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला गेला. रस्त्यांसाठी निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. आमच्यात १०० कोटींचे रस्ते करून घेण्याची धमक आहे. त्याची काळजी माजी पालकमंत्री करू नयेत.”
ते पुढे म्हणाले, “येणाऱ्या दिवाळीत तरी थेट पाईपलाईनने शहरवासीयांना अभ्यंगस्नान करता येईल का, याकडे लक्ष द्यावे.
“अधिकाऱ्यांचा पुळका का आला?”
हक्कभंग हा लोकप्रतिनिधींचा अधिकार असल्याचे सांगत क्षीरसागर म्हणाले, “अधिकाऱ्यांनी जनहिताच्या कामात दिरंगाई केली, तर त्यांच्यावर हक्कभंग दाखल होणारच. खासदार शाहू छत्रपती यांच्या सूचनाही अधिकारी डावलतात, हे सतेज पाटील मान्य करतात. मग अशा अधिकाऱ्यांना वाचवण्याचा पुळका का आला?”
“जनतेच्या मताधिक्याने निवडून आलो, शिंगावर घ्यायलाही तयार”
क्षीरसागर म्हणाले, “मला ३० हजार मताधिक्याने जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेसाठी काम करणे हेच माझे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडताना कोणालाही शिंगावर घ्यायला मी तयार आहे. पण मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार?”
“सात नाही आठ कलर द्या, पण भगवाच फडकणार”
महानगरपालिकेतील आगामी निवडणुकीकडे लक्ष वेधत आमदार क्षीरसागर म्हणाले,
“सतेज पाटील यांनी सात नाही आठ कलर द्यावेत, पण या निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकलेला दिसेल. टोलची पावती फाडणे, पाण्याच्या टाकीचे राजकारण, हद्दवाढीबाबत अबोला, महामार्गाला विरोध — अशा पद्धतीने शहराच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचे काम सतेज पाटील यांनी वर्षानुवर्षे केले आहे. मात्र आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.”
मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार? – आमदार राजेश क्षीरसागर यांचा पलटवार
|