शैक्षणिक
सकारात्मक अभिव्यक्तीतूनच माणूसपणाची जडणघडण : डॉ. आलोक जत्राटकर
By Administrator - 1/17/2026 2:50:03 PM
Share This News:
कोल्हापूर :- सकारात्मक अभिव्यक्तीमुळे व्यक्तिमत्त्व घडते आणि मानवतेचा व्यापक अर्थ उलगडतो, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील अंतर्गत शिक्षकांच्या गुणवत्ता व कौशल्यवृद्धीसाठी आयोजित कौशल्य विकास उपक्रमांतर्गत ‘बातमीलेखन’ विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाला आणि कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आल्याने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. जत्राटकर यांनी अभिव्यक्ती ही मानव असण्याची मूलभूत अट असल्याचे नमूद करत, आजूबाजूच्या जीवनातून प्रेरणा घेत वाचन, लेखन आणि संवादाच्या माध्यमातून अभिव्यक्तीच्या दिशा विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले. अनुभव आणि सातत्याच्या सरावातूनच ही कौशल्ये आत्मसात होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातमीलेखन ही एक शिस्तबद्ध आणि शैलीदार कला असून योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सरावाच्या आधारे प्रत्येक व्यक्ती हे कौशल्य विकसित करू शकते, असे मत त्यांनी मांडले. यावेळी त्यांनी संज्ञापन प्रक्रिया, बातमीलेखनाचे मूलभूत घटक, वार्तामूल्ये, लेखनाचे विविध प्रकार तसेच बहुमाध्यमी बातमीचे स्वरूप याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. नितीन रणदिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. सचिन भोसले यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संदीप थिटे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. नगीना माळी यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर यांच्यासह सर्व समन्वयक, सहायक प्राध्यापक आणि कोर्स कॉर्डिनेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते
सकारात्मक अभिव्यक्तीतूनच माणूसपणाची जडणघडण : डॉ. आलोक जत्राटकर
|