शैक्षणिक
प्रशासनातील विनम्र व्यक्तिमत्व : प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचा सेवागौरव समारंभ उत्साहात
By nisha patil - 11/11/2025 5:24:56 PM
Share This News:
प्रशासनातील विनम्र व्यक्तिमत्व : प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचा सेवागौरव समारंभ उत्साहात
कोल्हापूर, दि. ११ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या सेवागौरव सदिच्छा समारंभाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. शिक्षण क्षेत्रात तब्बल ३९ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या डॉ. कुंभार यांनी कराड, कडेपूर, सातारा, तासगाव, इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील विविध शाखांमध्ये आपल्या प्रभावी प्रशासनकौशल्य आणि दूरदृष्टीने महाविद्यालयांच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.
या प्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “माणसांना जपणारे, घडविणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार. विवेकानंद कॉलेजला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.”
कार्यक्रमात डॉ. कुंभार यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, श्री महालक्ष्मीची मुर्ती आणि आहेर देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रा. सतीश उपळावीकर व विद्यार्थी ऋषी डोंगरे यांनी रेखाटलेले त्यांचे व्यक्तिचित्र भेट देण्यात आले. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे आणि सीईओ कौस्तुभ गावडे यांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी म्हटले की, “शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा आदर्श घेत प्राचार्य डॉ. कुंभार यांनी शिक्षण आणि प्रशासनात ठसा उमटविला. ते दूरदृष्टी आणि विवेकाने निर्णय घेणारे व्यक्तिमत्व आहेत.”
सत्काराला उत्तर देताना डॉ. कुंभार म्हणाले, “संस्थेमुळे माझी ओळख निर्माण झाली. कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या पाठिंब्यामुळे मी मुक्तपणे कार्य करू शकलो. संस्थेच्या प्रत्येक शाखेत भौतिक व शैक्षणिक विकास घडविण्याचा प्रयत्न केला. जरी मी दुसऱ्या संस्थेत जात असलो तरी विवेकानंद शिक्षण संस्थेशी जोडलेली माझी नाळ कायम राहील.”
या कार्यक्रमास संस्थेचे विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, हितेंद्र साळुंखे, डॉ. शिवाजी पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रा. जे. के. पाटील, डॉ. एकनाथ आळवेकर, डॉ. संजय लठ्ठे, डॉ. डी. आर. तुपे, डॉ. वर्षा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. पी. थोरात यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले, तर आभार प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी मानले. कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, आजीव सेवक आणि डॉ. कुंभार यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनातील विनम्र व्यक्तिमत्व : प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचा सेवागौरव समारंभ उत्साहात
|