राजकीय
संयम आणि आक्रमकपणा यांचे मी रसायन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
By nisha patil - 10/11/2025 11:23:59 AM
Share This News:
मळगे बुद्रुक, दि. ९: स्वर्गीय कै. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्याकडून शिकलेला संयम आणि स्वर्गीय कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब यांच्याकडून शिकलेला आक्रमकपणा यांचे मी अद्भुत रसायन आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मळगे बुद्रुक ता. कागल येथील ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भाषणात श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, १९७६ साली स्वर्गीय कै. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शाहू साखर कारखान्याचा संचालक म्हणून मी सार्वजनिक कामाला सुरुवात केली. नंतर केडीसीसी बँकेत संचालक म्हणून निवडून गेलो. त्यानंतर माझे आणि स्वर्गीय कै. विक्रमसिंहराजे घाटगे यांचे मतभेद झाल्यानंतर मी स्वर्गीय कै. सदाशिवराव मंडलिकसाहेबांचे नेतृत्व स्वीकारले.
हमीदवाडा साखर कारखाना स्थापनेमध्ये फार मोठे योगदान दिले. या सगळ्या वाटचालीत स्वर्गीय कै. घाटगे यांचा संयम आणि स्वर्गीय कै. मंडलिक यांचा आक्रमकपणा माझ्यामध्ये आला. म्हणूनच मी संयम आणि आक्रमकपणाच एक अद्भुत रसायन बनलो. माझ्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मळगे बुद्रुक गाव माझ्या पाठीशी फार मोठ्या ताकदीनिशी राहिले, असेही ते म्हणाले.
भैरवनाथाचे लक्ष आहे.......!
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गावाच्या मध्यवर्ती ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर देवालयाच्या जवळच ग्रामपंचायतीची सुंदर इमारत झाली आहे. या इमारतीमधून ग्रामस्थांच्या कल्याणाचा म्हणजेच गावाच्या विकासाचा कारभार करा. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी पाठीमागून ग्रामदैवत भैरवनाथाचे तुमच्यावर लक्ष आहे, हे लक्षात ठेवा.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे, एकनाथ पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
व्यासपीठावर बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, आनंदराव अस्वले, विश्वंभर हावलदार, सरपंच शांतादेवी पाटील, उपसरपंच एकनाथ वायदंडे, श्रीकांत पाटील, रघुनाथ अस्वले, दीपक कमळकर, आनंदराव पाटील, डी. एम. चौगुले, बी. एम. पाटील, सुभाष चौगुले, दत्ता पाटील- केनवडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत प्रताप पाटील यांनी केले. प्रास्ताविक भगवान अस्वले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार दिनेश कांबळे यांनी मानले.
संयम आणि आक्रमकपणा यांचे मी रसायन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
|