बातम्या

सर्व पात्र संस्थांना १०० टक्के पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

I will persistently advocate for ensuring that all eligible institutions


By nisha patil - 10/18/2026 12:15:22 PM
Share This News:



पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार

सर्व पात्र संस्थांना १०० टक्के पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अनुदानास पात्र शाळा आणि वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळावे, तसेच सध्या २०, ४०, ६० आणि ८० टक्के अनुदानावर असलेल्या सर्व पात्र शाळांना एकरकमी १०० टक्के पूर्ण अनुदान मिळावे, यासाठी शासनदरबारी ठोस पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी दिली.

राज्यातील अनेक शाळा आजही अंशतः अनुदानाच्या टप्प्यांमध्ये अडकल्या आहेत. पुढील अनुदानाचा टप्पा मिळविण्यासाठी शिक्षक आणि संस्थांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. काही शाळांना पूर्ण अनुदान मिळण्यासाठी अनेक दशके वाट पाहावी लागत असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस धोरणाची आवश्यकता असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.

अंशतः अनुदानित शाळांमधील पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शिक्षकांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, केवळ टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याऐवजी सर्व पात्र संस्थांना पूर्ण अनुदान देण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

अनुदानाच्या विलंबामुळे शिक्षकांच्या नियमित वेतनाचा आणि आर्थिक स्थैर्याचा प्रश्न निर्माण होतो. त्याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर तसेच शाळांच्या शैक्षणिक वातावरणावरही होऊ शकतो. त्यामुळे पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या शाळा आणि वाढीव तुकड्यांना निर्धारित वेळेत अनुदान मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.

राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेत अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. राज्यात अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित अशा दोनच प्रकारच्या शाळांची व्यवस्था असावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. सर्व पात्र संस्थांना पूर्ण अनुदान मिळाल्यास शिक्षक-कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी अधिक पोषक वातावरण उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.

शिक्षकांचे वेतन, संस्थांना अनुदान मिळण्यातील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळात आणि शासनस्तरावर सातत्याने आवाज उठविणार असल्याचा निर्धार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला.

“पात्र शाळा आणि वाढीव तुकड्यांना अनुदानासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागू नये. सर्व पात्र संस्थांना एकसमान १०० टक्के पूर्ण अनुदान मिळावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबावे आणि महाराष्ट्रात अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अशा दोनच प्रकारच्या शाळांची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी मी आग्रही राहणार आहे,” अशी ग्वाही शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी दिली.


सर्व पात्र संस्थांना १०० टक्के पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे
Total Views: 61