विशेष बातम्या

कोल्हापूरात आय.टी. पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा

IT Park in Kolhapur paved the way


By nisha patil - 12/13/2025 6:01:39 PM
Share This News:



कोल्हापूरात आय.टी. पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा

आय.टी. पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार – आमदार राजेश क्षीरसागर

नागपूर, दि. १३ : कोल्हापूर शहरात आय.टी. पार्क उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, आय.टी. पार्क स्थापनेसह आवश्यक जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती होऊन स्थानिक युवक-युवतींना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

कोल्हापूर शहर आय.टी. क्षेत्रासाठी पूरक असतानाही जागेअभावी रोजगारनिर्मितीला मर्यादा येत होत्या. आय.टी. पार्क उभारणीमुळे केवळ रोजगारनिर्मितीच नव्हे तर कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नातही लक्षणीय वाढ होणार आहे. आय.टी. पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रलंबित होता. याबाबत आमदार क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून विधिमंडळाचे लक्ष वेधले होते.

या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. आमदार क्षीरसागर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी. पार्क स्थापनेसह शेंडा पार्क येथील जागा आय.टी. पार्क व इतर शासकीय प्रयोजनांसाठी देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

या निर्णयाबद्दल आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. आगामी काळात आय.टी. पार्कच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाचे सुवर्णद्वार खुले होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


कोल्हापूरात आय.टी. पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा
Total Views: 17