बातम्या
भक्तीमय वातावरणात आजऱ्यात घरगुती गणरायाचे विसर्जन
By nisha patil - 2/9/2025 11:42:46 PM
Share This News:
भक्तीमय वातावरणात आजऱ्यात घरगुती गणरायाचे विसर्जन
(हसन तकीलदार):आजरा / प्रतिनिधी :आजऱ्यात उत्साही आणि भक्तीमय वातावरणात घरगुती गणरायाचे विसर्जन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
ग्रामदैवत श्री रवळनाथाच्या मानाची गणेश मूर्ती पालखीतून सर्वप्रथम विसर्जनासाठी नेण्यात आली. त्यानंतर इतर मानकरी व प्रत्येक गल्ली-कॉलनीतील मूर्ती विधिवत पूजा करून माता-भगिनींसह विसर्जनासाठी निघाल्या, अशी माहिती गौरव देशपांडे यांनी दिली. विसर्जनाच्या वेळी भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साहाबरोबरच विरहाची भावुकता दिसून आली.
पर्यावरण संवर्धनासाठी यावेळी निर्माल्यदान उपक्रम राबविण्यात आला. गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रदूषणाला आळा घालण्यास हातभार लावला.
हिरण्यकेशी नदीचे घाट, मोरजकर महाराज समाधीजवळील घाट तसेच नेसरी मार्गावरील चित्री नदी घाटावर विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भक्तीमय वातावरणात आजऱ्यात घरगुती गणरायाचे विसर्जन
|