ताज्या बातम्या
कोल्हापूरमध्ये वाढता जागरूकतेचा प्रभाव : दहा महिन्यांत २० बालविवाह हाणून पाडले
By nisha patil - 11/14/2025 12:57:59 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात बालसुरक्षेबाबत गेल्या दहा महिन्यांत झालेली प्रगती विशेष उल्लेखनीय आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्डलाईन यांच्या संयुक्त हस्तक्षेपामुळे २० अल्पवयीन मुलींचे विवाह थांबवण्यात यश मिळाले. या कालावधीत एकूण ३६ संशयित बालविवाह प्रकरणे समोर आली; त्यापैकी १६ मुली वैद्यकीय तपासणीत गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
प्रशासनाच्या माहितीनुसार करवीर तालुका सर्वाधिक घटनांसह अग्रस्थानी राहिला. तक्रार प्राप्त होताच संबंधित पथके तत्काळ गावात पोहोचून पालकांचे समुपदेशन, मुलींच्या कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली.
अल्पवयात विवाह न करण्याचे बंधपत्र घेऊन पुढील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी, ग्रामस्थ प्रतिनिधी आणि पोलिसपाटील यांना जबाबदारी देण्यात आली. आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबावामुळे अजूनही काही भागांत बालविवाहाचे प्रमाण दिसून येत असल्याने जनजागृती अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. गावातील कोणालाही अशा प्रकाराची शंका आली तर १०९८ या मदत क्रमांकावर संपर्क साधल्यास त्वरित कारवाई केली जाते.
“सुरक्षित बालपण, उज्ज्वल भविष्य” हा संकल्प बळकट करत, कोल्हापूर जिल्ह्याला पूर्णपणे बालविवाहमुक्त करण्यासाठी मोहिमा अधिक वेगाने राबवल्या जात आहेत.
कोल्हापूरमध्ये वाढता जागरूकतेचा प्रभाव : दहा महिन्यांत २० बालविवाह हाणून पाडले
|