बातम्या

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना करा

Implement immediate safety measures to prevent accidents on the highway


By nisha patil - 9/24/2026 7:22:44 PM
Share This News:



महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना करा

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी ते कागलदरम्यान सुरू असलेल्या रुंदीकरण व इतर कामांमुळे गोकुळ शिरगाव परिसरात वारंवार अपघात होत आहेत. कामगार व नागरिकांच्या सुरक्षेसाठी महामार्गावरील कामाच्या ठिकाणी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आयटक संलग्न गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेने केली आहे.

 

गोकुळ शिरगाव एमआयडीसी तसेच कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांची या मार्गावरून दररोज ये-जा असते. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य दिशादर्शक फलक, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली.
 

दि. २२ सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाचे कर्मचारी कै. रामचंद्र सदाशिव पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगारांमध्ये नाराजी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
 

या मागणीचे निवेदन २४ सप्टेंबर रोजी आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक जी. पी. बैरवा यांना उजळाईवाडी येथील NHAI कार्यालयात देण्यात आले.
 

महामार्गावरील सुरक्षा उपाययोजना तातडीने न केल्यास नाईलाजास्तव राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद केले आहे.
 

यावेळी लक्ष्मण पाटील, शाहीर सदाशिव निकम, व्ही. डी. पाटील, संभाजी शेलार, दत्तात्रय बच्चे, संदेश पाटील, योगेश चव्हाण, प्रविण करडे, विजयकुमार कांबळे आणि वैभव पाटील उपस्थित होते.


महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना करा
Total Views: 9