बातम्या
धर्म व देवस्थानांच्या संरक्षणासाठी ‘अँटी लॅन्ड ग्रॅबिंग कायदा’ लागू करा!
By nisha patil - 11/18/2025 5:00:25 PM
Share This News:
धर्म व देवस्थानांच्या संरक्षणासाठी ‘अँटी लॅन्ड ग्रॅबिंग कायदा’ लागू करा!
महाराष्ट्र मंदिर महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोल्हापूर : राज्यातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी भूमाफियांनी गैरमार्गाने बेकायदेशीररीत्या हडपल्याच्या वाढत्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रकारांना तातडीने आळा घालण्यासाठी गुजरात व कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर ‘अँटी लॅन्ड ग्रॅबिंग अॅक्ट’ लागू करावा, अशी ठाम मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले. या प्रसंगी गुरव समाजातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या वेळी महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट म्हणाले, “आज मंदिरांना दैनंदिन खर्च, उत्सव आणि व्यवस्थापनासाठी भक्तांकडे मदतीची अपेक्षा करावी लागत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या मालकीच्या कोट्यवधींच्या जमिनी भूमाफियांच्या ताब्यात गेल्या आहेत. ही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला निश्चितच शोभणारी नाही.”
ते पुढे म्हणाले की, देवस्थान इनाम जमिनी कायद्यानुसार अहस्तांतरणीय असतानाही महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर फेरफार करून या जमिनी बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केल्या गेल्याचे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात ‘जमीन हडप विरोधी कायदा’ मंजूर करून तो दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचा ठेवावा. भूमाफिया आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी किमान 14 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठरवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या कार्यक्रमाला उद्योजक हरिश्चंद्र धोत्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. आनंद गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, महासंघाचे जिल्हा संयोजक प्रमोद सावंत, सहसंयोजक अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे पदाधिकारी संभाजीराव भोकरे, शशी बीडकर, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, तसेच अर्चना गुरव, डॉ. सुरेश गुरव आणि गुरव समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्म व देवस्थानांच्या संरक्षणासाठी ‘अँटी लॅन्ड ग्रॅबिंग कायदा’ लागू करा!
|