ताज्या बातम्या

कोल्हापुरात गॅस शवदाहिनीपेक्षा पारंपरिक दहनपद्धतीला अधिक प्राधान्य; एक कोटींची गॅसदाहिनी वापरात कमी

In Kolhapur traditional cremation method is preferred over gas


By nisha patil - 11/15/2025 1:49:14 PM
Share This News:



कोल्हापूर : पुरोगामी विचारांसाठी ओळख असलेल्या कोल्हापूर शहरात अनेक आधुनिक सुविधा स्वीकारल्या जात असल्या, तरी स्मशानभूमीत बसविण्यात आलेल्या गॅसदाहिनीबाबत मात्र नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शहरात पर्यावरण संरक्षण आणि लाकूड-अभाव लक्षात घेऊन २०१६–१७ साली मूळचे कोल्हापूरचे असलेल्या राजेंद्र चव्हाण यांनी स्मशानभूमीसाठी एक गॅसदाहिनी मोफत दिली होती.

ती जीर्ण झाल्यानंतर महापालिकेने तब्बल एक कोटी रुपये खर्चून नव्या गॅसदाहिनीची उभारणी केली. ही दाहिनी वीजेवरही चालू शकते अशी व्यवस्था असूनही, गेल्या नऊ महिन्यांत केवळ ७३ मृतदेहांचे गॅसदहन करण्यात आले. त्याच कालावधीत पारंपरिक पद्धतीने लाकूड व शेणीचा वापर करून रोज १२ ते १५ अंत्यसंस्कार केले जात आहेत, हे चित्र बदलाच्या स्वीकारात आलेल्या मर्यादा दाखवते.

महापालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेणी व लाकूड खरेदी करते; मात्र वृक्षतोड कमी झाल्याने लाकूड उपलब्धतेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी महापालिकेने गॅसदाहिनीचा पर्याय दिला असला, तरी नागरिकांचे पारंपरिक दहनपद्धतीवरील भावनिक व सांस्कृतिक आकर्षण अजूनही अधिक दृढ आहे. महापालिका सामाजिक भावनेतून मृत व्यक्तींसाठी मोफत अंत्यसंस्कार आणि मृतदेह नेण्यासाठी मोफत शववाहिका देत असल्याने शहरातील हा उपक्रम राज्यभर कौतुकास पात्र ठरला आहे. परंतु, तरीही नागरिकांनी आधुनिक पद्धतीकडे वळण्यासाठी मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे, असे प्रशासनाचे मत आहे. ‘मृतदेह लाकडात जाळला किंवा गॅसदाहिनीत, त्यातील विधींच्या पवित्रतेत कोणताही फरक पडत नाही’ याबाबत जनजागृतीची चळवळ राबविण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


कोल्हापुरात गॅस शवदाहिनीपेक्षा पारंपरिक दहनपद्धतीला अधिक प्राधान्य; एक कोटींची गॅसदाहिनी वापरात कमी
Total Views: 73