बातम्या
ट्रॅक्टरच्या युगात नालबंदांचा व्यवसाय संकटात! पिढ्यान्पिढ्यांची कला लुप्त होण्याच्या मार्गावर!
By nisha patil - 10/24/2026 2:13:00 PM
Share This News:
ट्रॅक्टरच्या युगात नालबंदांचा व्यवसाय संकटात! पिढ्यान्पिढ्यांची कला लुप्त होण्याच्या मार्गावर!
प्रतिनिधी हसन तकीलदार शेतीतलं यांत्रिकीकरण वाढलं… बैलजोड्यांची संख्या घटली… आणि याचा मोठा फटका बसलाय तो पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या नालबंद व्यवसायाला! आजऱ्यात पारंपरिक नालबंदीची कला टिकवण्यासाठी कारागीरांची धडपड सुरू आहे.
पूर्वी शेतीची मशागत, बैलगाडीची वाहतूक, धान्याची मळणी अशा अनेक कामांसाठी बैलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जायचा. त्यामुळे बैलांच्या खुरांना नाल बसवणाऱ्या नालबंदांना गावोगावी मोठी मागणी होती. मात्र, ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांच्या वाढत्या वापरामुळे बैलजोड्या कमी झाल्या आणि नालबंदांच्या कामावरही मर्यादा आल्या.
आजऱ्यातील नालबंद कारागीर इरफान काकतिकर सांगतात की, पूर्वी आठवडा बाजार आणि गावच्या यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम मिळायचं. मात्र, आता कमी कामासाठी दूरवर जावं लागतं. बैलगाडी शर्यतींच्या शौकीनांमुळे काही बैलजोड्या टिकून आहेत आणि त्यातूनच या व्यवसायाला थोडाफार आधार मिळतोय. विशेष म्हणजे, काकतिकर यांची तिसरी पिढी या व्यवसायात असून, पुढची पिढीही ही पारंपरिक कला जपावी यासाठी ते आपल्या मुलाला प्रशिक्षण देत आहेत.आधुनिकतेच्या लाटेत पारंपरिक व्यवसाय हरवू नयेत, यासाठी शासनानेही मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ट्रॅक्टरच्या युगात नालबंदांचा व्यवसाय संकटात! पिढ्यान्पिढ्यांची कला लुप्त होण्याच्या मार्गावर!
|