शैक्षणिक

शिरसंगी हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न

Inauguration ceremony of Taluka Level Science Exhibition


By nisha patil - 11/12/2025 5:38:46 PM
Share This News:



शिरसंगी हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न 
 

आजरा(हसन तकीलदर)*:-आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित आदर्श हायस्कूल शिरसंगी व पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बुधवार दि. 10 व गुरुवार दि.11 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन व पद्मश्री भोजे अणुशास्त्रज्ञ यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी , प्रमुख वक्ते व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते पुष्पहार घालून संपन्न झाला. 
     

उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कारानंतर प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक  संजय कुमार पाटील यांनी केले. त्यानंतर संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनी आपल्या मनोगत सांगितले की, मुलांना विज्ञानाचा दृष्टिकोन देण्यासाठी, त्यांच्यामध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी ,त्यांची निरीक्षण शक्ती वाढावी, कुतूहल जागे व्हाव ,तसेच त्यांना आपल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी प्रवृत्त करता यावं यासाठीच प्रयोगशाळा, उपकरण निर्मिती, व प्रदर्शन महत्त्वाचे आहे. लहान मुलांना आपल्या मनामध्ये  व सभोवतालच्या चालणाऱ्या अनेक अडचणींवर उपाय शोधण्यासाठी विज्ञानच उपयोगी आहे व त्यांच्या कल्पक विचारातून पर्यावरणाचे रक्षण ,कचऱ्याचे व्यवस्थापन, त्याचबरोबर ऊर्जेच्या समस्या तसेच आज विजेपासून दूरध्वनी पर्यंत व आपण फिरणाऱ्या वाहनापासून ते आरोग्य सेवेपर्यंत या सगळ्याच व्यवस्था विज्ञानाच्या संशोधनातून निर्माण झालेल्या आहेत.
 

तसेच वाढत्या लोकसंख्येचे समाधान शोधायचे असेल, पर्यावरण पूरक विकास साधायचा असेल तर या लहान मुलांच्या मनात आतापासून त्याबद्दलचे गांभीर्य आणि त्याचा विचार करण्याची वृत्ती  निर्माण करणे हाच खऱ्या अर्थाने विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

हे विचार आपले शिक्षकवर्ग आणि शासन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं महान कार्य करत आहेत याचा नेहमीच आनंद वाटतो . विज्ञान म्हणजे केवळ जुन्या वैज्ञानिक शोधांचं नुसतं प्रदर्शन नाही तर नवीन विचार आणि कल्पना यांना चालना देऊन मानवी जीवनाचे समाधान शोधणे हे आहे. तसेच या बालकांना प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण झाले पाहिजे त्यातूनच जिज्ञासूवृत्ती व शोधक वृत्ती जन्माला येणार आहे.
     

यानंतर प्रमुख वक्ते डॉ. प्राध्यापक एस. के. नेर्ले यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे व रुजवणे का गरजेचे आहे हे सांगितले. विज्ञानाच्या शक्तीने शब्दांना पंख देत नव्या कल्पनांनी विश्वाचा शोध घेण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासावी असे सांगितले.
   

 अध्यक्षीय मनोगतामध्ये  जयवंतराव शिंपी यांनी सांगितले की, आपल्या भारतीय भूमीमध्ये अनेक शास्त्रज्ञ ज्यांनी जगभरात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला  डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम यासारखे अनेक शास्त्रज्ञ खेड्यापाड्यातून जन्माला आले मात्र त्यांनी आपल्या शोधकवृतीने व अपार कष्ट करण्याच्या तयारीमुळेच ते आपल्या जीवनात यशस्वी झाले.

लोकसंख्येच्या दृष्टीने आपला देश मोठा आहे त्यामुळे समस्याही फार आहेत त्या सोडवण्यासाठी शेती ,उद्योग, तंत्रज्ञान या माध्यमातून शास्त्रज्ञांनी अपार मेहनतीने संशोधन करून अनेक चांगल्या वाटा निर्माण करून दिल्या आहेत. याची सर्व बीजे विद्यार्थी दशेतच या बालशास्त्रज्ञांमध्ये रुजलेली होती. म्हणून हे हिरे शोधण्यासाठीच शाळा ,तालुकास्तर ,जिल्हा स्तर ,राज्यस्तर व देश पातळीवर असे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
     कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  एम. एम. देसाई यांनी केले त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक दालनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले .माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील दालनाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार  सुनील पाटील यांच्या हस्ते केले प्राथमिक अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य करण्याचे उद्घाटन  पांडुरंग जाधव , कृष्णा पटेकर यांच्या हस्ते तर माध्यमिक अध्यापक शैक्षणिक साहित्य निर्मिती गट या जालनाचे उद्घाटन  सचिन शिंपी यांच्या हस्ते केले प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर निर्मिती शैक्षणिक साहित्य गट या दालनाचे उद्घाटन  विलास पाटील तर ग्रंथ प्रदर्शन जालनाचे उद्घाटन सुधीर जाधव यांच्या हस्ते केले गेले

या कार्यक्रमाकरिता गटशिक्षणाधिकारी  बसवराज गुरव, शिक्षण विभागातील मान्यवर अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, विविध प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी समाजसेवी व्यक्तिमत्व व पदाधिकारी उपस्थित होते. आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा मधील सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तालुक्यातील सर्व विज्ञान गणित शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


शिरसंगी हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न
Total Views: 33