बातम्या
महापालिका शाळांमधील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवा - आप ची बैठकीत मागणी
By nisha patil - 5/29/2025 9:05:12 PM
Share This News:
महापालिका शाळांमधील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवा - आप ची बैठकीत मागणी
दिल्लीमध्ये असलेल्या महापालिकेच्या सुसज्ज आणि स्वच्छ शाळांचा पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबववा यासाठी आम आदमी पार्टीने पाठपुरावा सुरु केला आहे. शहरातील महानगरपालिका शाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्वे केला होता. याबाबत तयार झालेल्या अहवालानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 54 शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत महिनाभरापूर्वी बैठक पार पडली होती. यानंतर महापालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत सुविधा वाढवण्यासाठी ऍक्शन प्लॅन करण्याचे ठरले होते. यावर आढावा घेण्यासाठी उपायुक्त कपिल जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
बैठकीत शाळेतील पायाभूत सुविधा, नवीन वर्ग, पाण्याची सोय, स्वच्छतागृह, ओपन बार, अतिक्रमण, क्रीडा प्रबोधिनी आदी प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली.
शाळांच्या आवरात फोफावलेल्या ओपन बारवर कारवाई कधी करणार अशी विचारणा आप चे प्रदेश संघटन सचिव यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना केली.
यावर त्यांनी संबंधित ठिकाणी गस्त वाढवून गुन्हे दाखल करू असे सांगितले.
आप ने केलेल्या पाठपुराव्याने शाळेतील भौतिक सोईसुविधा सुधारण्यासाठी नऊ कोटी छत्तीस लाख रुपयांचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने महापालिकेला सादर केला आहे. परंतु वार्षिक बजेट मधून हा खर्च शक्य नसल्याचे प्रशासनाधिकारी यांनी सांगितले. शिक्षण समितीकडे बजेट नसेल तर जिल्हा नियोजनकडे मागणी करावी, महिला व बालकल्याण मधून ऐशी लाख रुपये स्वच्छतागृहासाठी तरतूद आहे, त्यामधून निधी घ्यावा अशी सूचना महासचिव अभिजित कांबळे यांनी केली.
सासने मैदानावारील क्रीडा प्रबोधनीचा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यावर तातडीने काम करावे तसेच स्वच्छता, खरमाती उठाव यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली. समग्र शिक्षण अभियानातून निधीची मागणी करावी, कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा, महिला व बालकल्याणकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवावेत अशा मागण्या आप शिष्टमंडळाने केल्या.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, विजय हेगडे, मयुर भोसले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, उपशहर अभियंता , सुरेश पाटील, ए. के गुजर, कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील, मीरा नागीमे, चारही पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.
महापालिका शाळांमधील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवा - आप ची बैठकीत मागणी
|