ताज्या बातम्या
पन्हाळा तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर; ग्रामस्थांमध्ये भीती, वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
By nisha patil - 1/1/2026 1:21:50 PM
Share This News:
पन्हाळा तालुक्यातील आपटी पैकी सोमवारपेठ परिसरात बिबट्याचा सतत वावर आढळून येत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून गावाच्या हद्दीत वारंवार बिबट्या दिसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, अंगणवाडी तसेच शाळेच्या परिसरातही बिबट्याची हालचाल दिसून आल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या शेतात गवत कापणीचे काम सुरू असल्याने शेतकरी आणि मजुरांनाही जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तानाजी शामराव केसरकर हे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेले असता, बिबट्याने गुरगुर करत त्यांच्या दिशेने येण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि ते सुरक्षित बचावले.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने दखल घ्यावी, बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच गावात आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
वनविभागाने त्वरित पावले उचलून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
पन्हाळा तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर; ग्रामस्थांमध्ये भीती, वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
|