राजकीय
भुदरगड पंचायत समितीसमोर बेमुदत ठिय्या व आत्मक्लेश आंदोलन
By nisha patil - 6/1/2026 4:47:40 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल व बिनचूक चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, तसेच दप्तर दिरंगाई थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भुदरगड पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवार दि. ६ जानेवारी २०२६ पासून बेमुदत ठिय्या आंदोलन व आत्मक्लेश सत्याग्रही आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या प्रकरणात कोणतीही सत्यता न तपासता बेकायदेशीर पत्रव्यवहार करून संबंधितांना अभय दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच ५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामसंघाची बैठक बेकायदेशीररित्या मंदिरात कोंडून ठेवून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक कॉम्रेड संग्राम सावंत व सीआरपी सारिका देवेकर करत असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाला आरळगुंडीतील ग्रामस्थांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रशासनाकडून विनंती करण्यात आली असली तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
भुदरगड पंचायत समितीसमोर बेमुदत ठिय्या व आत्मक्लेश आंदोलन
|