बातम्या
कोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र समुपदेशन केंद्र
By nisha patil - 4/9/2025 3:53:17 PM
Share This News:
कोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र समुपदेशन केंद्र
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानंतर नवा निर्णय
कोल्हापूर, दि. 4 : तृतीयपंथीयांच्या मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक अडचणींवर उपाय म्हणून छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र समुपदेशन केंद्र सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
या केंद्रामुळे तृतीयपंथीयांना भेदभावमुक्त वातावरणात मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी सुरक्षित जागा मिळेल. विशेष प्रशिक्षित समुपदेशक त्यांना मानसिक आधारासह रोजगारक्षमतेसाठी मार्गदर्शन करतील.
बैठकीत तृतीयपंथी धोरण 2024 च्या अंमलबजावणीतील अडचणी, उपाययोजना आणि भविष्यातील नियोजनावर चर्चा झाली. ओळखपत्रधारक तृतीयपंथीयांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वैद्यकीय तपासणीची अट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 42 प्रमुख कार्यालयांपैकी 27 मध्ये समन्वय अधिकारी नेमले गेले आहेत.
महाविद्यालयांत जागृती कार्यक्रम, स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय, शिधा वितरणासाठी प्रायोगिक योजना आणि तृतीयपंथी कल्याण कक्षाची माहिती प्रसारित करण्याचेही निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील 190 तृतीयपंथीयांची माहिती संकलित करून त्यांना आधार, रेशन आणि मतदान ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
कोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र समुपदेशन केंद्र
|