खेळ
“कोहली–गिलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय”
By nisha patil - 12/1/2026 12:58:06 PM
Share This News:
कोहली–गिलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय” विराट कोहली (९३) आणि शुभमन गिल (५६) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडवर चार विकेट राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १–० अशी आघाडी घेतली.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत आठ बाद ३०० धावा केल्या. डेव्होन कॉनवे (५६), हेन्री निकोल्स (६२) आणि डरैल मिचेल (८४) यांनी संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. भारताकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
३०१ धावांचे लक्ष्य गाठताना भारताची सुरुवात सावध झाली. रोहित शर्मा (२६) आणि कर्णधार शुभमन गिल यांनी ३९ धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर गिल आणि विराट कोहली यांनी डाव सावरत ११८ धावांची भक्कम भागीदारी रचली. गिल ५६ धावांवर बाद झाला, मात्र कोहलीने आपला दमदार फॉर्म कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेले.
यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर (४९) यांनी आणखी ७७ धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने ९१ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ९३ धावा करत विजयाची पायाभरणी केली. तो शतकाच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला.
नंतर हर्षित राणा (२९) आणि के. एल. राहुल (नाबाद २९) यांनी संयमी खेळ करत विजय सुलभ केला. अखेर वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ७) यांच्या साथीत राहुलने भारताला ४९ षटकांत सहा गडी गमावून ३०६ धावांपर्यंत पोहोचवत सामना जिंकून दिला.
या सामन्यात विराट कोहलीने ४५ व्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. तसेच त्याने २८ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पाही ओलांडला. ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना भारताने वनडेत २० वा विजय मिळवण्याचा विक्रमही केला.
न्यूझीलंडच्या सुमार क्षेत्ररक्षणाचाही भारताला फायदा झाला. तीन सोपे झेल सुटल्याने भारतीय फलंदाजांना डाव सावरण्याची संधी मिळाली.
या विजयासह भारताने मालिकेत आघाडी घेतली असून उर्वरित सामन्यांमध्येही संघाकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
“कोहली–गिलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय”
|