बातम्या
स्टार्टअप आणि एआयच्या युगात भारताची जागतिक झेप
By Administrator - 1/17/2026 1:12:28 PM
Share This News:
भारताच्या तरुणांच्या कल्पकतेवर, धाडसावर आणि आत्मविश्वासावर पूर्ण विश्वास असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येत्या दशकात भारत केवळ स्टार्टअप क्षेत्रातच नव्हे, तर जागतिक तंत्रज्ञानाच्या आघाडीवरही नेतृत्व करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी विविध स्टार्टअप संस्थापकांशी संवाद साधत त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनांची माहिती घेतली. आजचा शोध हीच उद्याची बौद्धिक संपदा ठरणार असल्याने संशोधन, नवकल्पना आणि उत्पादनक्षमतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
२०१४ साली देशात अवघी काही मोजकी स्टार्टअप्स होती, मात्र आज ही संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. भारत आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून ओळखला जात आहे. याशिवाय, एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्यांकन असलेल्या १२५ हून अधिक ‘युनिकॉर्न’ कंपन्या भारतात कार्यरत आहेत, ही बाब देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्याचे द्योतक आहे.
विशेष म्हणजे, स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा वाढता सहभागही उल्लेखनीय आहे. सुमारे ४५ टक्के स्टार्टअप्समध्ये महिला संचालक किंवा भागीदार असल्याने ‘स्त्रीशक्ती’ नव्या भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भारताने वर्चस्व निर्माण करावे, असे आवाहन करत पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांना जागतिक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला. नवकल्पनांमधून आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञानाधारित भारत उभारण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
स्टार्टअप आणि एआयच्या युगात भारताची जागतिक झेप
|