बातम्या

कॅथेटर संसर्ग रोखण्यासाठी इंडोल-इम्प्रेग्नेशन तंत्रज्ञान यशस्वी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यश

Indole impregnation technology successful in preventing catheter infections


By nisha patil - 12/29/2025 4:09:53 PM
Share This News:



कॅथेटर संसर्ग रोखण्यासाठी  इंडोल-इम्प्रेग्नेशन तंत्रज्ञान यशस्वी    डी  वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना  यश 

कोल्हापूर :  रुग्णालयांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आणि गंभीर मानल्या जाणाऱ्या कॅथेटर-अॅसोसिएटेड युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (CAUTI) वर नियंत्रण मिळवण्यासाठी इंडोल-इम्प्रेग्नेटेड सिलिकॉन युरीनरी कॅथेटरचे अभिनव संशोधन करण्यात डी  वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाना  यश आले आहे. कॅथेटरच्या पृष्ठभागावर बायोफिल्म तयार होण्यास प्रतिबंध करून संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करण्यास  हे संशोधन उपयुक्त ठरणार असून रुग्णांच्या सुरक्षित उपचारांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे.

मूत्राशय नैसर्गिकरीत्या रिकामे करता न आल्यास रुग्णांना कॅथेटर लावण्यात येतो. मात्र कॅथेटरच्या पृष्ठभागावर तयार होणारी बायोफिल्म ही कॅथेटर-अॅसोसिएटेड युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे प्रमुख कारण मानली जाते. रुग्णाला कॅथेटर लावल्यानंतर दररोज ३ ते ६ टक्क्यांनी संसर्गाचा धोका वाढत असल्याने, यावर सुरक्षित व प्रभावी उपाय शोधण्याची मोठी गरज होती. याच पार्श्वभूमीवर शुद्ध इंडोल वापरून सिलिकॉन युरीनरी कॅथेटरचे इम्प्रेग्नेशन करण्याची नवी आणि किफायतशीर पद्धत विकसित करण्यात आली आहे.

डी  वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी  रिसर्चमधील डॉ. अश्विनी काळे, डॉ. एस. मोहन करूपाईल यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉ. सायली चौगुले, सुस्मिता सतीश पाटील यांनी हे संशोधन केले . या सर्व टीमला अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे  मार्गदर्शन लाभले. इंडोल-आधारित कोटिंगमुळे कॅथेटरच्या पृष्ठभागावर जिवाणू व बुरशींची वाढ रोखली जाते. विशेषतः कॅंडिडा अल्बिकन्स, ई. कोलाई, स्टॅफिलोकोकस आणि स्यूडोमोनास एरुगिनोसा यांसारख्या सूक्ष्मजीवांच्या बायोफिल्म निर्मितीत लक्षणीय घट आढळून आली आहे.

इंडोल हे सूक्ष्मजीवांकडून नैसर्गिकरीत्या तयार होणारे जैवसक्रिय संयुग असून ते बायोफिल्म निर्मितीवर प्रभाव टाकते. कमी प्रमाणात इंडोल वापरून विकसित केलेली ही पद्धत सोपी, सुरक्षित आणि किफायतशीर असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले. या तंत्रज्ञानामुळे रुग्णांचा त्रास कमी होणे, अँटिबायोटिक्सचा वापर घटणे, उपचार खर्च आणि रुग्णालयातील उपचार कालावधी कमी होण्याची मोठी शक्यता आहे.

या उल्लेखनीय संशोधनाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे आणि संशोधन संचालक प्रा. पी. एस. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.


कॅथेटर संसर्ग रोखण्यासाठी इंडोल-इम्प्रेग्नेशन तंत्रज्ञान यशस्वी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यश
Total Views: 66