बातम्या
कोल्हापुरात महिलांसाठी औद्योगिक वसाहत; १७ कर्मचाऱ्यांची सेवा नियमित
By nisha patil - 8/20/2025 3:23:08 PM
Share This News:
कोल्हापुरात महिलांसाठी औद्योगिक वसाहत; १७ कर्मचाऱ्यांची सेवा नियमित
मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कोल्हापूरसह राज्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेसाठी कसबा करवीर परिसरातील अडीच हेक्टर शासकीय जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या जमिनीवर महिला सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन केली जाणार असून त्यातून महिला उद्योजक घडणार आहेत, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. संस्थेच्या मागणीनुसार ही जमीन जाहीर लिलावाशिवाय रेडी रेकनर दराने भोगवटादार वर्ग दोन म्हणून देण्यात येणार असून यासाठी शासनाने ठराविक अटी व शर्ती घातल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये तांत्रिक संवर्गातील गट-क श्रेणीतील पदांवर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत असलेल्या १७ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सेवानिवृत्ती, मृत्यू आणि इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांवर या कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. आता या सर्व कर्मचाऱ्यांना अटी-शर्तींसह नियमित सेवा देण्यात येणार आहे.
कोल्हापुरात महिलांसाठी औद्योगिक वसाहत; १७ कर्मचाऱ्यांची सेवा नियमित
|