बातम्या

एकटी संस्था व कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा पुढाकार; “स्वच्छता हीच खरी सेवा”चा प्रभावी संदेश

Initiative of a single organization and Kolhapur Cancer Center


By Administrator - 2/23/2026 6:05:05 PM
Share This News:



राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आर. के. नगर ओढा परिसरात भव्य स्वच्छता मोहीम

एकटी संस्था व कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा पुढाकार; “स्वच्छता हीच खरी सेवा”चा प्रभावी संदेश

कोल्हापूर, दि. 23 फेब्रुवारी 2026 : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त एकटी संस्था व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आर. के. नगर येथील ओढा परिसरात भव्य व प्रेरणादायी स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली.

संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक तसेच झाडाझुडपांची साफसफाई करण्यात आली. “स्वच्छता हीच खरी सेवा” या गाडगेबाबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले. या उपक्रमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

यावेळी एकटी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी उपस्थित नागरिकांना कचऱ्याचे उत्पत्तीस्थळी (Source Level) विलगीकरण करण्याचे महत्त्व पटवून दिले. ओला व सुका कचरा वेगळा देणे, प्लास्टिक व पुनर्वापरयोग्य कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण कसे करता येते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एकटी संस्था संकलित सुक्या कचऱ्यावर श्रेडिंग, बेलिंग आदी प्रक्रिया करून शास्त्रोक्त व्यवस्थापन कसे करते, याची माहिती देण्यात आली.

मोरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच ए. व्ही. कांबळे यांनी मनोगत व्यक्त करत एकटी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्रभाग स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या मोहिमेस मोरेवाडी ग्रामपंचायत व सरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, वनिता सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा सामंत, निरंजना चव्हाण, शोभा नलवडे, वैद्यही जोशी, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जोशी, डॉ. अमिता पतकी, ममता मिरजकर, नसीम मुल्ला, नमिता खोत, महेश खाडिलकर, आर. बी. पाटील, मृणाल चव्हाण, नार्वेकर, भाजीपाला मार्केट अध्यक्षा गुणवंता पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

एकटी संस्थेचे शुभम कांबळे, सविता कांबळे, रोहित दिघे, अभिजित कांबळे, उमाकांत कांबळे, पुष्पा कांबळे, सागर कोगले यांच्यासह संपूर्ण टीमने स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

या मोहिमेमुळे ओढा परिसर स्वच्छ करण्यात यश आले असून नागरिकांनी नियमित कचरा विलगीकरण करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. भविष्यातही विविध भागांमध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापन विषयक जनजागृती उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे एकटी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

ही स्वच्छता मोहीम केवळ एक दिवसाचा उपक्रम न ठरता स्वच्छ, निरोगी व जबाबदार समाज घडविण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे सर्व उपस्थितांनी नमूद केले.


एकटी संस्था व कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा पुढाकार; “स्वच्छता हीच खरी सेवा”चा प्रभावी संदेश
Total Views: 46