ताज्या बातम्या
४ जिल्ह्यांतील ग्रामीण रुग्णालयांची तपासणी; स्वच्छता, उपकरणे आणि औषध व्यवस्थापनात मोठे प्रश्न उघड
By nisha patil - 11/17/2025 1:11:29 PM
Share This News:
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये अचानक करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. ४ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकूण ३५ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा नीट उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
काही रुग्णालयांत वैद्यकीय उपकरणे विनावापर पडून असल्याचे तर काही ठिकाणी मुदतबाह्य औषधे साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ होती आणि खिडक्यांत पालापाचोळा अडकून असल्याचे तपासणी पथकाला दिसले. आयईसीचे साहित्य आणि वैद्यकीय उपकरणे कोपऱ्यात धूळ खात पडले होती. अनेक ठिकाणी डॉक्टर तसेच वर्ग ३ व ४ कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याचेही निदर्शनास आले.
सांगली जिल्ह्यातील जत ग्रामीण रुग्णालयात पंचकर्म टेबल वापरात नसून स्वेदन पेटीचा वापर औषधे साठवण्यासाठी केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोकणातील मंडणगड ग्रामीण रुग्णालयात कचरा व्यवस्थापनाची अवस्था तर अधिकच बिकट असून, प्लास्टिक कचरा आणि वापरलेले मास्क कोपऱ्यात साठवून ठेवले असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी स्वच्छतेची योग्य व्यवस्था अनेक दिवस केलेली नसल्याचे पथकाच्या नजरेत आले.
या तपासणीसाठी प्रत्येकी दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि कोणतीही पूर्वसूचना न देता चिठ्ठीद्वारे रुग्णालयांची निवड करून तपासणी करण्यात आली. त्यामुळे कोणालाही तयारीची संधी मिळाली नाही. काही रुग्णालयांत आहाराचा दर्जा समाधानकारक असल्याचे आढळले, मात्र बहुसंख्य ठिकाणी स्वच्छता, उपकरणांचा वापर, औषध साठवणूक आणि मनुष्यबळ हे गंभीर प्रश्न असल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवली जात असून पुढील काळात ग्रामीण रुग्णालयांमधून अधिक चांगली व सक्षम रुग्णसेवा मिळावी, हा या तपासणीचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
४ जिल्ह्यांतील ग्रामीण रुग्णालयांची तपासणी; स्वच्छता, उपकरणे आणि औषध व्यवस्थापनात मोठे प्रश्न उघड
|