बातम्या
राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने ‘सी फॉर चॅम्पियन’चा मार्ग — आ. सुधीर मुनगंटीवार
By nisha patil - 11/23/2025 5:49:16 PM
Share This News:
राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने ‘सी फॉर चॅम्पियन’चा मार्ग — आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र आयोजित महाअधिवेशनात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांना आत्मविश्वास, नेतृत्व आणि साहसाची नवी दिशा दर्शवणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने आजची स्त्री निर्भय, आत्मविश्वासू आणि सक्षम झाली पाहिजे. समाजपरिवर्तनाची दिशा तुमच्या नेतृत्वातूनच घडेल” असे आवाहन त्यांनी उपस्थित भगिनींना केले.
प्रियदर्शिनी सभागृहात झालेल्या या महाअधिवेशनात मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. महिला नेतृत्व, सामाजिक परिवर्तन, संघटन उभारणी आणि राष्ट्राभिमान या विषयांवर अर्थपूर्ण चर्चा घडली.
महाअधिवेशनात सत्कार स्वीकारताना आ. मुनगंटीवार म्हणाले, “जसा ‘सी फॉर चंद्रपूर’ या भावनेने आपण एकत्र आलो, तसाच या अधिवेशनानंतर प्रत्येक भगिनी ‘सी फॉर चॅम्पियन’ बनून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरेल.”
आपल्या कार्यकाळातील ऐतिहासिक विकासकामांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमी सिंदखेडराजा विकासासाठी ५० कोटी रुपये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तपश्चर्यास्थळ श्रीशैलम येथे ध्यानमंदिर उभारणीसाठी ३.२५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. या ध्यानमंदिराला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
राजमाता जिजाऊ आणि माता महाकाली यांच्या प्रेरणेने स्त्रीशक्तीला सक्षम बनवण्याचा संदेश देत मुनगंटीवार यांनी “स्त्रीशक्तीचा प्रवास अधिक सामर्थ्यवान, परिणामकारक आणि परिवर्तन घडवणारा ठरो” अशा शुभेच्छांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने ‘सी फॉर चॅम्पियन’चा मार्ग — आ. सुधीर मुनगंटीवार
|