राजकीय
मतमोजणीत पारदर्शकता व अचूकता राखण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 12/20/2025 10:41:24 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. १९ : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवा प्रशासकीय चूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे जिल्ह्यातील सर्व १३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या. मतमोजणी प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित ठेवणे ही प्रशासनाची मुख्य जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करूनच मतमोजणीची प्रत्येक फेरी पार पाडावी. मतमोजणी केंद्रावर टेबलांची रचना अशी असावी की उमेदवारांच्या प्रतिनिधींना ईव्हीएममधील मते स्पष्टपणे दिसतील. प्रत्येक फेरीचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर करून उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतरच पुढील फेरी सुरू करावी, असेही त्यांनी निर्देश दिले. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी शनिवारी योग्य पद्धतीने तालीम घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतमोजणी केंद्र परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जाणार असून, संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. केवळ अधिकृत प्रवेशपत्र असलेल्या व्यक्तींनाच केंद्रात प्रवेश दिला जाईल, तसेच मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात लागू असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तत्काळ ईव्हीएम तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे सांगण्यात आले. तसेच, निकाल प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी वेळोवेळी लाऊडस्पीकरवरून अधिकृत घोषणा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विजयोत्सवाच्या नावाखाली मिरवणुका किंवा रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या ऑनलाइन बैठकीला सहआयुक्त जिल्हा नगरप्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जयसिंगपूरच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह इतर सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणीत पारदर्शकता व अचूकता राखण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी अमोल येडगे
|