राजकीय
भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस तीव्र! 50 पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची तयारी, कोल्हापुरात पक्षाला मोठा धक्का?
By nisha patil - 12/24/2025 11:34:20 AM
Share This News:
भाजपच्या तिकीट वाटप प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना डावलल्याच्या आरोपांमुळे कोल्हापुरात पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५० पदाधिकाऱ्यांनी साdमूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे या ५० जणांमध्ये मंडल अध्यक्षव मंडल चिटणीस पदावर कार्यरत असलेले पदाधिकारीही समाविष्ट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मात्र, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या शब्दामुळे हा राजीनाम्याचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. तरीही तिकीट वाटपात न्याय न झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये खोलवर रुजलेली असून, त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.
जर भाजप नेतृत्वाने या नाराजीवर वेळीच आणि प्रभावी तोडगा काढला नाही, तर मोठा असंतुष्ट गट दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोल्हापुरात भाजपची संघटनात्मक पकड लक्षणीयरीत्या कमकुवत होण्याची दाट शक्यता असून, याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो.
ही स्थिती कायम राहिल्यास आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपसमोर गंभीर आव्हान उभे राहू शकते.
सध्या जरी राजीनामे थांबले असले, तरी पक्षातील असंतोषाचा हा उद्रेक भाजपसाठी धोक्याची घंटा ठरत असून, पुढील काही दिवसांत पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस तीव्र! 50 पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची तयारी, कोल्हापुरात पक्षाला मोठा धक्का?
|