ताज्या बातम्या
डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी संस्थेत ‘ब्लॉकचेन, डिस्ट्रीब्यूटेड सिस्टीम्स अँड सिक्युरिटी’वरील आंतरराष्ट्रीय परिषद
By nisha patil - 10/27/2025 5:14:58 PM
Share This News:
डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी संस्थेत ‘ब्लॉकचेन, डिस्ट्रीब्यूटेड सिस्टीम्स अँड सिक्युरिटी’वरील आंतरराष्ट्रीय परिषद
कोल्हापूर : प्रतिनिधी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीतर्फे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन, डिस्ट्रीब्यूटेड सिस्टीम्स अँड सिक्युरिटी (ICBDS 2025)’ या अत्याधुनिक विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ३०, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.
ही प्रतिष्ठित परिषद IEEE मुंबई सेक्शन, पुणे सेक्शन आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (CSI), पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. देश-विदेशातील नामांकित तज्ज्ञ या परिषदेत उपस्थित राहून ब्लॉकचेन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि वितरित संगणक प्रणाली या विषयांवरील आपले संशोधन सादर करणार आहेत.
IEEE (Institute of Electrical and Electronics Engineers) ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य तांत्रिक संस्था असून नेटवर्किंग, इंटरनेट आणि वाय-फाय यांसारख्या तंत्रज्ञानाच्या मानकनिर्मितीत तिचे मोठे योगदान आहे. दक्षिण महाराष्ट्रात होणारी ही पहिलीच IEEE आंतरराष्ट्रीय परिषद आहे.
या परिषदेकरिता जपान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया तसेच भारतातील नामांकित विद्यापीठांमधून एकूण १०७९ संशोधन निबंध प्राप्त झाले असून त्यापैकी २१० निवडक निबंध सादर व प्रकाशित केले जाणार आहेत.
परिषदेत जपानच्या सुरक्षा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी मा. वैभव मेहता प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत, तर ऑस्ट्रेलियातील करटेन विद्यापीठाचे डॉ. विद्यासागर पोतदार यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.
तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू प्रा. नरेश इंगळे यांच्यासह अनेक नामांकित संशोधक, प्राचार्य, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ पाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, “या परिषदेच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील संशोधन क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल. शिक्षण, संशोधन आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने ही परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.”
ही परिषद दक्षिण महाराष्ट्रातील तांत्रिक क्षेत्रासाठी एक नवा अध्याय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी संस्थेत ‘ब्लॉकचेन, डिस्ट्रीब्यूटेड सिस्टीम्स अँड सिक्युरिटी’वरील आंतरराष्ट्रीय परिषद
|