बातम्या
कोल्हापुरात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
By Administrator - 10/2/2026 4:39:59 PM
Share This News:
कोल्हापुरात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
कोल्हापूर : क्रीडा पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर साकार होणार आहे.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनकडून आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या मागणीसाठी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांनी एकत्रित प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच तत्कालीन क्रीडामंत्र्यांकडे यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला होता.
करवीर तालुक्यातील विकासवाडी येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या ४२१ हेक्टर क्षेत्रापैकी १२ हेक्टर जमीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या स्टेडियममुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मोठी संधी मिळणार असून कोल्हापूरची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट नकाशावर ठळक होणार आहे.
आमदार अमल महाडिक यांची प्रतिक्रिया
“कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार. माझ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम होणार असल्याचा विशेष आनंद आहे. लवकरच भव्य स्टेडियम आकाराला येऊन कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला नवी ऊर्जा मिळेल,” असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे, १९८० च्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज असा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. तब्बल चार दशकांनंतर पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.
या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात निश्चितच भर पडेल, असा विश्वास आमदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापुरात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
|