बातम्या

शिरढोण ग्रा.पंच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत अनियमितता 

Irregularities in the 15th Finance


By nisha patil - 9/24/2026 3:49:00 PM
Share This News:



शिरढोण ग्रा.पंच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत अनियमितता 

 सरपंच, ग्रामसेवक सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा; खुलासा घेऊन जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश
 

शिरढोण प्रतिनिधी ( संजय गायकवाड ) /ता.२४  शिरढोण (ता.शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील अनियमितता, अपूर्ण दप्तर आणि कर वसुलीच्या रकमेतून रोखीने खर्च केल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जयवंत द. उगले यांनी संबंधित कालावधीतील सरपंच व  ग्रामपंचायत सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा घेऊन जबाबदारी निश्चित करून अहवाल पाठवून देण्याचे आदेश शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे शिरढोणमध्ये एकच खळबळ उडाली असून आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.
     

तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी विनायक आनंदा शेवरे व दयानंद राऊ (डी. आर) कांबळे यांच्याविरुद्ध या प्रकरणी खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. मात्र, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकासकामे करणे, साहित्य खरेदी, ग्रामपंचायत सभेची मंजुरी, आर्थिक व्यवहार, कामांच्या नोंदी तसेच साठा व डेडस्टॉक रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे या बाबींमध्ये पदाधिकारी व संबंधीत सदस्यांचीही भूमिका असल्याने त्यांची जबाबदारी तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
       

तक्रारदार अविनाश रामगोंडा पाटील व इतरांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या तक्रारीतील आर्थिक अनियमिततेच्या बाबींचीही दखल घेण्यात आली आहे. संबंधित सरपंच व सदस्यांकडून खुलासा घेऊन त्यांची भूमिका व जबाबदारी निश्चित करावी, तसेच सविस्तर चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे तातडीने सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 

सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक कार्यरत आहे. मात्र, संबंधित कालावधीतील कारभाराची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शिरढोणमध्ये चर्चेला उधाण आले आहे. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
      सरपंच, अधिकाऱ्यांनंतर संबंधित सदस्यही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत 
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील अनियमित प्रकरणी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनंतर आता संबंधित सरपंच व सदस्यांचीही भूमिका तपासली जाणार आहे. कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा घेतला जाणार असून, निधीचा वापर, विकासकामे, साहित्य खरेदी, मंजुरी व आर्थिक व्यवहारातील जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.


शिरढोण ग्रा.पंच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत अनियमितता 
Total Views: 103