बातम्या

शिक्षण तपस्वी जे.पी.नाईक नागरी पतसंस्थेचा कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय*

J p Naik


By nisha patil - 2/7/2026 11:47:38 AM
Share This News:



**शिक्षण तपस्वी जे.पी.नाईक नागरी पतसंस्थेचा कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय*

 *३ वर्षांनंतर सेवा कायम, ७ वर्षांनंतर 7 वी वेतनश्रेणी लागू*

**आजरा(हसन तकीलदार)*: शिक्षण तपस्वी जे. पी. नाईक नागरी पतसंस्था, आजरा संचालक मंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण व दूरदृष्टीचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संस्थेतील कर्मचाऱ्यांना नोकरीची अधिक सुरक्षितता, कार्यक्षमतेला प्रोत्साहन, सेवेला योग्य सन्मान आणि भविष्याची आर्थिक स्थिरता मिळावी या उद्देशाने नवीन सेवा धोरणास मंजुरी देण्यात आली.

या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत त्यांच्या सेवेला योग्य न्याय देण्यासाठी हे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.

नवीन निर्णयानुसार, संस्थेमध्ये सलग व समाधानकारक ३ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. सेवा कायम झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना संस्थेच्या नियमांनुसार व संचालक मंडळाच्या मान्यतेने दरवर्षी सामान्य वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात येईल.

याशिवाय, सलग ७ वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार आहे. हा लाभ देताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, गोपनीय अहवाल, शिस्त, सेवेतील सातत्य, कामकाजातील प्रामाणिकपणा, संस्थेची आर्थिक स्थिती तसेच संचालक मंडळाची अंतिम मान्यता या बाबींचा विचार करण्यात येणार आहे.

संचालक मंडळाने या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या कार्याची दखल घेणे ही संस्थेची नैतिक जबाबदारी आहे. कर्मचारी समाधानी व सुरक्षित असल्यास संस्थेची सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होईल, सभासदांचा विश्वास वाढेल आणि संस्थेची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

चेअरमन प्रा.डॉ.शिवशंकर उपासे व व्हा.चेअरमन सुभाष विभुते यांनीही या निर्णयाचा आढावा घेताना सांगितले की, कर्मचारी हा संस्थेचा कणा आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित सेवा, नियमित वेतनवाढ आणि गुणवत्तेच्या आधारे उच्च वेतनश्रेणीची संधी उपलब्ध करून देणे ही संस्थेच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे भविष्यातही कर्मचारी कल्याणाला प्राधान्य देत अशाच लोकाभिमुख व कर्मचारी हिताच्या योजना राबविण्यात येतील.

संस्थेच्या इतिहासातील हा कर्मचारी कल्याणाचा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मानला जात असून, या निर्णयामुळे संस्थेतील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सेवेला योग्य सन्मान देणारा हा निर्णय इतर सहकारी संस्थांसाठीही आदर्श व अनुकरणीय ठरेल, अशी भावना संचालक मंडळाने व्यक्त केली.


शिक्षण तपस्वी जे.पी.नाईक नागरी पतसंस्थेचा कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय*
Total Views: 482