बातम्या

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांना श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात श्रद्धांजली

Jaysirav pawar


By nisha patil - 3/27/2026 3:25:15 PM
Share This News:



ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांना श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात श्रद्धांजली

 कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार जगभर रुजवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांना आज श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनी या महाविद्यालयामध्ये 26 वर्षे अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचे काम केले होते.

      महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले , शहाजी छत्रपती महाविद्यालयाला लेखकांचे महाविद्यालय म्हटले जाते. या महाविद्यालयातून ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांनी 1974 ते 2001साला पर्यंत इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम केले.या कालावधीत त्यांनी प्रचंड संशोधन,ग्रंथ लेखन,विद्यार्थी, प्राध्यापकांना मार्गदर्शनाचे काम केले. माजी मंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांचे सह डॉ.आबासाहेब शिंदे, डॉ. वामन कटांबळे, डॉक्टर केचे, डॉ.ठकर व इतर दिग्गज प्राध्यापकांना नेमले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि यांच्या विचाराचा प्रसार करण्याचे काम डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केले.

     डॉ. जयसिंगराव पवार यांचे जीवन कार्य, अध्यापन, संशोधन आणि लेखन प्रवासावरील एक विशेष चर्चासत्र आयोजित करणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले. 

 ते म्हणाले डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने एक चिकित्सक संशोधक, इतिहासकार हरपला आहे.त्यांच्या जाण्याने केवळ आपलेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.

   महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख सुरेश शिखरे म्हणाले, डॉ. पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र सोळा भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. त्यांनी ताराबाईकालीन कागदपत्रे यावरती संशोधन करून मोगल मर्दानी महाराणी ताराबाई यांचा चरित्र ग्रंथ प्रकाशित केला.क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वरती त्यांनी मोठे लेखन केले आहे. छत्रपती संभाजी ग्रंथातून संभाजी महाराजांच्या वरील अनेक तथ्यहीन आरोप त्यांनी पुराव्यानिशी खोडून काढले आहेत. त्यांनी शिवचरित्राचे लेखन, शहाजी छत्रपती महाराजांच्या चरित्र ग्रंथाचे लेखन आणि पंचगंगेच्या तीरावरील आत्मवृत्तही तयार केले आहे. 

   डॉ. शिवाजी रायजादे , डॉ. डी. के. वळवी यांनीही मनोगत व्यक्त करून डॉ. जयसिंगराव पवार यांना आदरांजली वाहीली. 

   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यांनी दोन मिनिटं स्तब्धता पाळून डॉ.पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

    श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन मिळाले. 

यावेळी आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर. डी. मांडणीकर, सह समन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के.एम.देसाई, प्रबंध रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते. 

 महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे ग्रंथालयात प्रदर्शन भरवून डॉ. जयसिंगराव पवार यांना आदरांजली वाहिली . या ग्रंथालयातील विविध संदर्भ साधनाचा उपयोग करून त्यांनी 25 हून अधिक संदर्भ ग्रंथ लिहिलेले आहेत.


ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांना श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात श्रद्धांजली
Total Views: 21