बातम्या

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, १५ दिवसांची मुदतवाढ

Jilha parishad 2


By nisha patil - 12/1/2026 7:03:30 PM
Share This News:



 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, १५ दिवसांची मुदतवाढ

 महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा देत जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून मुदतवाढीची मागणी केली होती.

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान १० दिवसांची अतिरिक्त मुदत द्यावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. ही मागणी ग्राह्य धरत सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना आलेल्या या आदेशामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, आगामी काही दिवसांत निवडणूक कार्यक्रमाला वेग येण्याची शक्यता आहे.


जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, १५ दिवसांची मुदतवाढ
Total Views: 33