राजकीय

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ राजर्षी शाहू आघाडीचा संयुक्त जाहीरनामा जाहीर

Joint manifesto of Rajarshi Shahu Aghadi released


By Administrator - 10/1/2026 1:35:30 PM
Share This News:



कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू आघाडीचा संयुक्त वचननामा आज जाहीर करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत नागरिकांच्या मूलभूत सुविधा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि प्रशासन सुधारणा यावर भर देण्यात आला आहे.

या संयुक्त वचननाम्यात शहरातील अंतर्गत रस्ते १०० टक्के सुस्थितीत ठेवणे, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एकमार्गी वाहतूक, नियोजित पार्किंग व्यवस्था, तसेच आयआरबीच्या ५१ किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

फेरीवाले झोनचे फेर सर्वेक्षण, मुख्य रस्ते पार्किंगविरहित करणे, केएमटी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे, उपनगरांमधून शहरात येणारी वाहतूक गतिमान करणे तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटवण्याचे ठोस धोरण जाहीर करण्यात आले आहे.

पाणीपुरवठ्याबाबत अभ्यास करून पूर्ण क्षमतेने स्वच्छ व मुबलक पाणी देणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरणे, तसेच महापालिकेच्या शाळा अद्यावत करून दोन शाळा ‘स्पोर्ट्स स्कूल’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय वचननाम्यात नमूद आहे.

आरोग्य क्षेत्रात सावित्रीबाई फुले व आयसोलेशन ही दोन रुग्णालये अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतरीत करण्यासह प्रभागनिहाय दवाखाने सुरू करून तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेत स्वतंत्र आरोग्य समिती व क्रीडा विभाग समिती स्थापन केली जाणार आहे.

महिलांसाठी स्वच्छतागृहे, पर्यटकांसाठी आधुनिक टॉयलेट-बाथरूम व्यवस्था, घरफाळा आकारणीतील त्रुटी दूर करून सुसूत्रता आणणे, महापालिकेचे दाखले व परवाने घरपोच व कमी वेळेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहर हद्दवाढीस प्राधान्य, केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून विकास निधी आणणे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारणे, सुसज्ज रिक्षा स्टॉप, इलेक्ट्रिक व सीएनजी रिक्षांना प्रोत्साहन अनुदान, तसेच जाहिरात फलक व शहरातील पुतळ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्थापन धोरण आखण्यात येणार आहे.

पंचगंगा नदी, रंकाळा, राजाराम तलाव व कळंबा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचेही वचननाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

हा संयुक्त वचननामा
व्ही. बी. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष),
संदीप देसाई (आम आदमी पार्टी)
आणि अरुण सोनवणे (वंचित बहुजन आघाडी)
यांच्या वतीने जाहीर करण्यात आला.

राजर्षी शाहू आघाडीच्या या वचननाम्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.


कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ राजर्षी शाहू आघाडीचा संयुक्त जाहीरनामा जाहीर
Total Views: 29