बातम्या

चांगभलंच्या जयघोषात श्री.जोतिबाची यात्रा संपन्न

Jotiba Yatra 5


By nisha patil - 12/4/2025 8:00:42 PM
Share This News:



चांगभलंच्या जयघोषात श्री.जोतिबाची यात्रा संपन्न 

लाखो भाविकांची उपस्थिती, गुलाल खोबऱ्याची उधळण

दख्खनचा राजा जोतीबाची चैत्र यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत देश भरातले भाविक आज जोतिबा डोंगरावर उपस्थित राहिले. गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हालगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. नवसाला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे. त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला जोतिबा डोंगरावर येतो. ज्योतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत गुलाल, खोबऱ्याची उधळण करीत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आणि चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला. डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या तसेच बैलगाडी, खासगी वाहनातून, चालत भाविक डोंगरावर दाखल झाले. 

जोतिबा मंदिरात पहाटे धार्मिक विधीनंतर सोहळ्यास प्रारंभ झाला.त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता पूजन झाल्यानंतर सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीमध्ये पहिला मान सातारा जिल्ह्यातील पाडळी इथल्या सासनकाठीचा असतो. त्यानंतर पाटण तालुक्यातील मौजे विहे, नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण,कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज, कसबा सांगाव, सातारा जिल्ह्यातील किवळ , सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद यांच्यासह मानाच्या एकूण १०८ सासन काठ्या सहभागी झाल्या.

दरम्यान कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे, धैर्यशील तिवले यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी मंदिरात जोतिबा देवाचे दर्शन घेतले.

यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रा पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे २५ हजारावर कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 


चांगभलंच्या जयघोषात श्री.जोतिबाची यात्रा संपन्न
Total Views: 140