बातम्या
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची भररस्त्यात हत्या; चाकूचे सपासप वार करून खून
By nisha patil - 9/27/2025 1:19:51 PM
Share This News:
बीड:- बीड शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरले आहे. स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका (वय 20) याचा माने कॉम्प्लेक्स परिसरात भररस्त्यात मित्राने चाकूने सपासप वार करून खून केला. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यश ढाका हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तो बलभीम नगर पेठ परिसरात कुटुंबासोबत राहत होता. त्याचे वडील देवेंद्र ढाका हे स्थानिक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करतात.
रात्री फोन, नंतर भीषण हल्ला
२५ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास माने कॉम्प्लेक्स परिसरात यशवर त्याच्या मित्राने चाकूने वार केले. छातीत वार झाल्याने यश जागीच गंभीर जखमी झाला. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून तो मृत असल्याचे घोषित केले.
पाच आरोपींवर खुनाचा गुन्हा
या प्रकरणी वडील देवेंद्र ढाका यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी सुरज आप्पासाहेब काटे याच्यासह एकूण पाच जणांवर भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित चार आरोपी अद्याप फरार आहेत.
नातेवाईकांचे आंदोलन
फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मृतक यश ढाका यांचे नातेवाईक व नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर मुसळधार पावसात तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना लवकरच अटक करू, असे आश्वासन दिले आहे.
या हल्ल्यात यश ढाका याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार मागे राहिला आहे.
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची भररस्त्यात हत्या; चाकूचे सपासप वार करून खून
|