राजकीय

व्ही. बी. पाटील म्हणजे एक अस्वस्थ आत्मा - केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांचा पलटवार

KDCC Bank Director Pratap alias Bhaiya Manes counterattack


By nisha patil - 7/5/2026 5:01:35 PM
Share This News:



व्ही. बी. पाटील म्हणजे एक अस्वस्थ आत्मा - केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांचा पलटवार
     
निव्वळ "आमानी" आणि "तुमानी" बोलून प्रश्न सुटणार नाहीत व्ही. बी. पाटील म्हणजे एक अस्वस्थ आत्मा आहेत, असा पलटवार केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँकेचे अध्यक्ष असलेले मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्याबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण भावना व्यक्त केलेल्या आहेत, असेही ते म्हणाले. 
      
या प्रसिद्धीपत्रकात श्री. माने यांनी पुढे म्हटले आहे, आमचे नेते आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेत नवीन संस्था सभासद केल्याबद्दल त्यांचा आरोप आहे. लोक ज्यावेळी संस्था काढतात त्यावेळी ज्या नेत्यावर त्यांचे प्रेम असते त्यांचे नाव देतही असतात. निव्वळ "आमानी" आणि "तुमानी" असल्या पोकळ शब्दांचा  बाजार मांडल्यावर ते संस्थाना नावे देत नाहीत. त्यासाठी लोकांचं आणि लोकांवरही प्रेम करावं लागतं. तसेच; व्ही. बी पाटील हे कोणत्याही सार्वजनिक निवडणुकीत निवडून आलेले नाहीत. त्यांनी किमान कोल्हापुरातील एखाद्या प्रभागातून तरी निवडून यावं. आमचे नेते शरद पवारसाहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेवढे त्यांनी टिकवून ठेवावं. नाहीतर; दुर्बिणीतून बघण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती त्यांनी करून टाकलेली आहे. 
       
पत्रकात पुढे म्हटले आहे, वास्तविक यापूर्वी श्री. पाटील हे केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळात आमच्या जिवावरच निवडून आलेले होते. त्या कालावधीत त्यांनी एकच प्रचंड महान कार्य केले, ते म्हणजे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्यात भांडणे लावण्याचे.  सातत्याने कान भरण्याच्या त्यांच्या सवयीतूनच आमचा दृष्ट लागण्यासारखा गट त्यावेळी फुटला. सातत्याने कानाला लागणे आणि समज- गैरसमज वाढविणे, हाच त्यांचा कायमचा धंदा आहे. 
          
आज केडीसीसी बँकेची यशस्वी वाटचाल आणि प्रगती ही भल्या -भल्यांचे डोळे दिपवणारी आहे. कोणताही राजकीय अभिनेवेश न ठेवता सर्वपक्षीय नेतृत्वाला एकत्र घेऊन केडीसीसी बँकेने ही आश्वासक प्रगती केली आहे. परंतु; बँकेचे अध्यक्ष, आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्याबद्दल मात्र व्यक्तिगत द्वेषातून श्री. पाटील सातत्याने चुकीची, खोटी आणि बेछूट द्वेषपूर्ण वक्तव्ये करतात. यापूर्वीही अशी वक्तव्ये त्यांनी अनेकदा केलेली आहेत. लोकही त्यांना फारसे महत्त्व देत नाहीत, हे सुद्धा आजपर्यंत अनेकवेळा लक्षात आलेले आहे. 
        
श्री. व्ही. बी.  पाटील हेही केडीसीसी बँकेचे यापूर्वी चेअरमन होते. त्यांनी चेअरमनपदाच्या कारकिर्दीत काय काम केले, हासुद्धा एक पी. एच. डी. च्या संशोधनाचाच विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाल्यानंतर त्यांनी स्वतःसोबत किती माणसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राहिली, याचाही कधीतरी शांत चित्ताने अभ्यास करावा. त्यांची विश्वासार्हता आणि लोकप्रियता एवढी प्रचंड मोठी आहे की, नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाविकास आघाडीमध्येसुद्धा घेतलं नाही, असा टोलाही श्री. माने यांनी लगावला आहे.
      
सतत बिनबुडाचे आरोप, कोणतेही पुरावे नसताना वक्तव्य करणे हा त्यांचा व्यवसायच आहे. त्यांना अशी वक्तव्य करायचीच असेल तर त्यांनी ती पुराव्यानिशी करावी लागतील. केडीसीसी बँक सबंध राज्यासह देशाच्याही अग्रस्थानी आहे. बँकेचा यशाचा हा चढता आलेख त्यांनी बँकेला भेट देऊन सविस्तर अभ्यास करावा. त्यातूनही त्यांना वेळ नसेल तर सर्व संबंधित कागदपत्रे आम्ही त्यांच्याकडे पाठवून देण्यास तयार आहोत.

 


व्ही. बी. पाटील म्हणजे एक अस्वस्थ आत्मा - केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांचा पलटवार
Total Views: 15